...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलं

Ravi Shastri On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासंदर्भात रवी शास्त्रीने सूचक विधान करताना त्याच्यासारख्या खेळाडूला संघात घेणं हे संघाचं समतोल बिघडवणारं कसं असू शकतं हे सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 30, 2024, 11:04 PM IST
...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलं title=
शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं

Ravi Shastri On Hardik Pandya: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेर गोष्टींमुळे अधिक चर्चेत आहे. मात्र तो सध्या श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 मालिकेत खेळत आहे. असं असलं तरी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये इच्छिक आराम घेतला आहे. विशेष म्हणजे हार्दिक आधीपासूनच कसोटीही खेळत नसताना आता त्याने एकदिवसीय क्रिकेटमधूनही आराम मागितल्याने त्याच्या संघातील स्थानाबद्दल चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ टी-20 मध्येच हार्दिक यापुढे दिसणार का अशीही चर्चा आहे. असं असतानाच भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी हार्दिकला कोणत्या परिस्थितीमध्ये एकदिवसीय संघात ठेवं हे संघासाठी धोक्याचं ठरु शकतं याबद्दल भाष्य केलं आहे.

हार्दिकने काय केलं पाहिजे?

'द आयसीसी' रिव्ह्यूच्या कार्यक्रमामध्ये रवी शास्त्रींनी हार्दिक पंड्याच्या आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त करताना त्याच्या गोलंदाजीवर याचा परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. इतक्यावर न थांबता शास्त्रींनी या अष्टपैलू खेळाडूला एकदिवसीय संघामध्ये परत येण्यासाठी काय करावं लागेल यासंदर्भातही सल्ला दिला. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर हार्दिकने काय करावं याबद्दल शास्त्रींनी मत व्यक्त केलं. 

...तर एकदिवसीय सामन्यांमध्ये नक्कीच मिळेल संधी

"मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे की त्याने क्रिकेट खेळत राहिलं पाहिजे. मला वाटतं की सामन्यातील फिटनेस फार महत्त्वाची असते. टी-20 संघामध्येही त्याला स्थान मिळालं तरी त्याने जास्तीत जास्त सामने खेळले पाहिजे. त्याला फिट वाटत असेल तर नक्कीच त्याला एकदिवसीय सामन्यांमध्येही संधी नक्कीच मिळेल, असं मला वाटतं," असं शास्त्रींनी होस्ट संजना गणेशनबरोबर चर्चा करताना म्हटलं.

नक्की वाचा >> '...तर तू अजून नेट्समध्येच असता', नेहराने जयसवालला तोंडावर सांगितलं; पाहा Video

...तर हार्दिकला संघात घेणं धोकादायक

मात्र पुढे बोलताना हार्दिकला कोणत्या परिस्थितीमध्ये संघात ठेवणं हे संघाचा बॅलेन्स बिघडवू शकणारं आणि संघासाठी धोकायदायक ठरु  शकतं याबद्दलही शास्त्रींनी भाष्य केलं. "हार्दिक खेळत असेल तर त्याने गोलंदाजी करुन संघाच्या कामगिरीत हातभार लावणं महत्त्वाचं ठरणार आहे. 10 ओव्हरऐवजी 3 ओव्हरचं टाकू शकतो असा खेळाडू असेल तर तुमच्या संघाचं बॅलेन्स बिघडू शकतं. जर त्याला प्रत्येक सामन्यात 10 पैकी 8 ओव्हर टाकता येत असतील आणि तो करतो त्याप्रमाणे फलंदाजीही करत असेल तर मला वाटतं की तो एकदिवसीय संघातूनही खेळू शकतो," असं शास्त्रींनी प्रांजळपणे सांगितलं.

शास्त्रींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

म्हणजेच हार्दिकची केवल फलंदाज म्हणून संघाला गरज नसून त्याच्या गोलंदाजीचीही आवश्यकता आहे. यापूर्वी इतरही अनेक खेळाडूंनी हार्दिकला अष्टपैलू म्हणूनच संघात स्थान दिलं जावं असं म्हटलं आहे. केवळ फलंदाजच हवा असेल तर हार्दिकपेक्षाही उत्तम असे इतर अनेक पर्याय उपलब्ध असल्याचं अनेक माजी क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे.