पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. मागच्या मॅचमध्ये सगळ्यात जलद ३५० विकेट घेण्याचा विक्रम करणाऱ्या अश्विनने या मॅचमध्येही रेकॉर्ड केला आहे.
पुण्यामध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये अश्विनने ४ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २ अशा एकूण ६ विकेट घेतल्या. आणि डेनिस लिली आणि चामिंडा वास यांचं रेकॉर्ड मोडलं. अश्विनने ६७ टेस्ट मॅचमध्ये ३५६ विकेट घेतल्या आहेत. तर डेनिस लिली यांनी ७० टेस्टमध्ये आणि चामिंडा वास यांनी १११ टेस्टमध्ये ३५५ विकेट घेतल्या होत्या.
अश्विनच्या निशाण्यावर आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान आणि डॅनियल व्हिटोरी यांचं रेकॉर्ड आहे. इम्रान आणि व्हिटोरी यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी ३६२-३६२ विकेट घेतल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली तिसरी टेस्ट १९ ऑक्टोबरपासून रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या टेस्टमध्ये ७ विकेट घेतल्या तर अश्विन इम्रान खान आणि व्हिटोरी यांचा रेकॉर्ड मोडेल.
भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने टेस्टमध्ये ६१९ विकेट घेतल्या. कुंबळेनंतर कपिल देव (४३४ विकेट) आणि हरभजन सिंग (४१७ विकेट) यांचा नंबर लागतो. ४०० विकेटचा आकडा गाठायला अश्विनला आणखी ४४ विकेटची गरज आहे. पुढच्या २ वर्षात अश्विनकडून अशीच कामगिरी झाली तर त्याला हरभजन आणि कपिल देव यांचाही विक्रम मोडता येईल.