अमर काणे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : विदर्भानं लागोपाठ दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. विदर्भाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला आदित्य सरवटे. आदित्यनं दोन्ही डावांमध्ये मिळून ११ विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावामध्ये ४९ रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. बॉलिंग असो किंवा बॅटिंग, यंदाच्या रणजी हंगामात प्रत्येकवेळी संकटमोचक म्हणून आदित्य विदर्भाच्या टीमसाठी धावून आला.
विदर्भाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आदित्यला क्रिकेटचं हे बाळकडू मिळालं हे वडिलांकडून. आदित्यचे वडील आनंद सरवटे चांगले क्रिकेटपटू होते. मात्र आदित्य साडेतीन वर्षांचा असताना १९९३ ला पनवेल इथे त्यांचा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्यानं गेल्या २५ वर्षांपासून ते अंथरुणावर खिळून पडलेत. त्यामुळे बालपणातच जबाबदारी पडल्यानं आदित्य परिपक्व झाला.
क्रिकेटच्या मैदानात घाम गाळणं असो, अंथरुणावर असलेल्या वडिलांचे उपचार असो, आईला मदत करणं असो टीमसाठी धावून जाणं असो, आदित्य प्रत्येकवेळी खंबीरपणं उभा असतो. आपल्या चॅम्पियन मुलाची नेत्रदीपक कामगिरी पाहून आदित्यच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
आपल्या यशामध्ये कुटुंबाचा विशेषतः आईचा मोलाचा वाटा असल्याचं आदित्यनंही स्पष्ट केलं. रणजीतली आदित्यची कामगिरी ही तर केवळ सुरूवात आहे. आदित्यला अजून यशाची बरीच शिखरं गाठायची आहेत. त्यासाठी त्याला खुप खुप शुभेच्छा.