भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा

भारताच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. 

Updated: Feb 7, 2019, 04:07 PM IST
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा title=

मेलबर्न : भारताच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. २४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया ५ वनडे आणि २ टी-२० मॅच खेळेल. या महत्त्वाच्या सीरिजसाठी एरॉन फिंच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असेल. दुखापत झाल्यामुळे फास्ट बॉलर मिचेल स्टार्कची टीममध्ये निवड झालेली नाही. स्टार्कला श्रीलंकेविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी बॉलिंग करताना दुखापत झाली होती. तर ऑलराऊंडर मिचेल मार्शला ऑस्ट्रेलियाच्या टीममधून डच्चू देण्यात आलाय.

मिचेल मार्शशिवाय पीटर सीडल आणि बिली स्टेनलेक यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. मार्च महिन्यात युएईमध्ये होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये मिचेल स्टार्क पुनरागमन करेल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे सदस्य ट्रेवर होन्स यांनी व्यक्त केली आहे.

२७ वर्षांचा फास्ट बॉलर केन रिचर्डसनचं जून २०१८नंतर टीममध्ये पुनरागमन झालं आहे. केन रिचर्डसननं २०१८-१९ च्या बिग बॅश लीगमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक २२ विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे रिचर्डसनची टीममध्ये निवड झाली. पाठीच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर झाल्यामुळे जॉस हेजलवूडही टीममध्ये नाही. हेजलवूडऐवजी पॅट कमिन्स आणि एलेक्स केरी ऑस्ट्रेलियाचे उपकर्णधार आहेत.

ऑस्ट्रेलियाची टीम

एरॉन फिंच(कर्णधार), पॅट कमिन्स, एलेक्स केरी, जेसन बेहरेनडॉर्फ, नॅथन कुल्टर नाईल, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाए रिचर्डसन, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनीस, ऍश्टन टर्नर, ऍडम झम्पा

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

तारीख  मॅच  ठिकाण
२४ फेब्रुवारी पहिली टी-२० बंगळुरू
२७ फेब्रुवारी दुसरी टी-२० विशाखापट्टणम
२ मार्च  पहिली वनडे  हैदराबाद
५ मार्च  दुसरी वनडे नागपूर
८ मार्च तिसरी वनडे रांची
१० मार्च चौथी वनडे मोहाली
१३ मार्च पाचवी वनडे दिल्ली