मुंबई : टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिका दौऱ्यावर आहे. आता कसोटी सुरु असून त्यानंतर वनडे सीरीजंही खेळण्यात येणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळत नसून केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. यावेळी टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादावर होणाऱ्या चर्चेवर बोलण झालं. यावर चेतन शर्मा म्हणाले, रोहित आणि विराट दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. आम्ही त्यांच्याशी बोलतो तेव्हा आम्हाला खूप मजा येते. नुसत्या अनुमानांवर जाऊ नका, दोघांमध्ये छान प्लॅनिंग आहे.
चेतन शर्मा यांनी सांगितलं की, दोन्ही खेळाडू एका कुटुंबाप्रमाणे आहेत. दोन्ही खेळाडू निवड समितीसोबत मोकळेपणाने बोलतात. वाद विवादांना 2021मध्येच सोडून द्या. 2022 मध्ये फक्त टीम सर्वोत्तम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही चेतन शर्मा म्हणाले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाची सर्वांना कल्पना आहे. विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी टीमची निवड झाली, त्याचवेळी विराट कोहली यापुढे एकदिवसीय संघाचा कर्णधार राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
यापूर्वीही या दोघांमध्ये वेळोवेळी मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, दोघांनाही याबाबत प्रश्न पडल्यावर ते केवळ हसतात. विराट कोहलीनेही यापूर्वी सांगितलं होतं की, त्याच्या आणि रोहितमध्ये कोणतीही अडचण नाही, मी हे अडीच वर्षांपासून सांगत आहे.