मुंबई : कुस्तीमधील फोगट भगिनींचा करिष्मा अजून संपलेला नाही...रितु फोगट या अजून एका भगिनीनं भारताला मेडलची कमाई करुन दिलीय. रितुनं वर्ल्ड अंडर 23 रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलय. कुस्तीमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणा-या स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय.
दंगल चित्रपटातील गीता आणि बबिता या फोगट बहिणींच्या मेहनतीचा आणि त्यांनी कुस्तीमध्ये भारताला मिळवून दिलेल्या यशाचा प्रवास पाहिला....या भगिनींचा वारसा चालवण्यासाठी विनेश फोगटनंतर आता रितू फोगट सज्ज झालीय. पोलंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड अंडर 23 रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गीत आणि बबिता यांची चुलत बहिण असलेल्या रितुनं 48 किलो वजनी सिल्व्हर मेडल जिंकत कुस्तीमधील फोगड भगिनींचं वर्चस्व कायम असल्याचंच दाखवून दिलं. विशेष म्हणजे कुस्तीमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणा-या या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलीय.
यापूर्वी या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंना केवळ एकदाच ब्राँझ मेडल पटकावता आलय. रितूनं गेल्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. मात्र या स्पर्धेत तिला आपल्या शानदार कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. फायनलमध्ये रितूचा मुकाबला टर्कीच्या ईविन देमिरहान हिच्याशी रंगला. दोन राऊंडनंतर लढत 4-4नं टाय झाली. मात्र टर्कीच्या देमिरहानला विजयी घोषित करण्यात आलं. कारण लढती दरम्यान रितुला एक सतर्क गुण देण्यात आला होता.
मनात संमिश्र भावना आहेत. सिल्व्हर जिंकल्याचा आनंद आहे. पण गोल्ड मेडलच्या एवढ्या जवळ जाऊन गमवल्याची खंत वाटतेय.अशी प्रतिक्रिया रितुनं फायनलनंतर व्यक्त केली. क्वार्टर फायनलमध्ये रितुनं बल्गेरियाच्या जॉर्जिवा सेलिश्खा 4-2 तर सेमी फायनलमध्ये चीनच्या जियाँग झूला 4-3 नं पराभूत केलं फायनल गाठली होती. फोगट बहिणींची ही दैदिप्यमान कामगिरी पाहिल्यावर ''म्हारी छोरियां छोरों से कम हैं के'' हा दंगल या चित्रपटातील संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.