मुंबई : युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून क्रिकेच्या महाकुंभाची, म्हणजेच आयपीएल 2021 ची सुरुवात होणार आहे. भारतामध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्या सत्रातील 29 सामन्यांनंतर कोविड संसर्गाच्या कारणामुळं स्पर्धा तात्पुरती स्थगित करावी लागली होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत.
काही संघ युएईमध्ये दाखलही झाले आहेत, तर काही खेळाडू तिथं पोहोचत आहेत. आयपीएलची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असतानाच मुंबईच्या संघानंही तयारी करण्यासाठी कंबर कसली आहे.
मुंबईच्या संघानं मागील वर्षी आयपीएलचं जेतेपद मिळवलं होतं. ज्यानंतर आता नव्या पर्वातील दुसऱ्या सत्रासाठी संघ सज्ज होत आहे. नव्या उत्साहात संघानं एका नव्या थीम साँगसह क्रीडारसिकांची भेट घेतली आहे.
- महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान
चला पलटन, #IPL2021 मध्ये होऊ द्या आपलाच आवाज #OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/KkTSbiOkYg
— Mumbai Indians (@mipaltan) September 15, 2021
मुंबई म्हणजे देशाची शान, तर मुंबईचा संघ म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा अभिमान अशा संदेशासह हे नवं गाणं सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. फार कमी वेळातच अत्यंत वेगळ्या धाटणीचं आणि मराठमोळा बाज असणारं हे गाणं सर्वांच्याच मनाचा ठाव घेत असून, क्रिडारसिकांची दाद मिळवत आहे. खुद्द निता अंबानीसुद्धा यामध्ये मराठी भाषा बोलताना दिसत आहेत. तर, रोहित शर्मा, हार्दीक पांड्या हे खेळाडू इथं फेटा बांधून गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत.
मुंबईच्या संघानं आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात 7 सामने खेळले, यामध्ये 4 सामन्यांत संघ विजयी ठरला. तर, तीन सामने संघाला गमवावे लागले. सध्या मुंबईचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या नव्या सत्रात मुंबईचा पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईच्या संघाविरोधात होणार आहे.