...या बाबतीत रोहित-मिताली दोघेही कमनशिबी

सध्या भारतीय महिला आणि पुरुष संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. 

Updated: Feb 2, 2019, 02:54 PM IST
...या बाबतीत रोहित-मिताली दोघेही कमनशिबी title=

हेमिल्टन : आपली क्रिकेट कारकीर्द स्मरणात राहील, अशी कामगिरी करायची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते. पण ही इच्छा प्रत्येक खेळाडूची पूर्ण होतेच असे नाही. स्मरणात राहिल अशी कामगिरी करण्याची संधी भारताचा (हंगामी कर्णधार) रोहित शर्मा आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांना होती. पण या दोघांना आठवणीत राहिल असा चमकदार विक्रम करता आला नाही.  

सध्या भारतीय महिला आणि पुरुष संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारतीय महिला आणि पुरुष संघाने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. तर भारतीय पुरुष संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत खेळल्या गेलेल्या ४ सामन्यातून पहिले सलग ३ सामने जिंकले आहेत. तर ३१ जानेवारीला झालेल्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेची ३-१ अशी परिस्थिती आहे. 

विक्रमाची संधी हुकली

न्यूझीलंड विरुद्धचा चौथा सामना हा रोहित शर्माचा २०० वा सामना होता. रोहितच्या नेतृत्वाखाली या सामन्यात भारताचा पराभव झाला. या चौथ्या सामन्यात भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली विजयी ठरला असता, तर रोहितच्या नावे एक विक्रम झाला असता. पण तसे झाले नाही. 

विराट कोहलीने त्याच्या नेतृ्त्वात भारतीय संघाला २०१७ साली सलग १२ सामन्यांत विजय मिळवून दिला होता. रोहित शर्माने कालच्या चौथ्या सामन्याआधी (३१ जानेवारी) , मार्च २०१८ पासून १२ सामन्यात नेतृत्व केले. या बाराही सामन्यात रोहितने आपल्या नेतृत्वात संघाला सलग विजय मिळवून दिला होता. 

न्यूझीलंड विरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना हा कर्णधार म्हणून रोहितचा तेरावा सामना होता. हा सामना रोहितच्या नेतृत्वाखाली जर जिंकला असता, तर हा नवा विक्रम ठरला असता. आणि विराटच्या सलग १२ सामन्यांच्या विजयाचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम झाला असता. नियमित कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी तसेच टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. त्यामुळे या सामन्यांसाठी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील 1 फेब्रुवारीला झालेला अखेरचा तिसरा सामना हा मिताली राजचा २०० वा एकदिवसीय सामना होता. त्यामुळे हा सामना आपल्या नेतृत्वात जिंकवून आपल्या कारकीर्दीतील २०० वा सामना अविस्मरणीय करण्याची संधी मितालीकडे होती. पण ही संधी मितालीने गमावली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा न्यूझीलंड महिला संघाने  ८ विकेटने पराभव झाला.

पुरुष संघाचा चौथ्या सामन्यात  आणि महिला संघाचा तिसऱ्या सामन्यात  झालेल्या पराभवामुळे,  रोहित शर्मा आणि मिताली राज या दोघांना आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील  २०० व्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.

जय-पराजयातील साम्य

एक गोष्ट लक्षात घेतली तर समजेल की, भारतीय महिला आणि पुरुष संघाच्या बाबतीत काही गोष्टी सारख्याच घडल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत महिला संघाने मालिका विजयासाठी आवश्यक असलेले दोन सामने सलग जिंकले. तर १ फेब्रुवारीला (आज) झालेल्या तिसऱ्या अखेरच्या सामान्यात ८ विकेटने पराभव स्वीकारला. 

तर भारतीय पुरुष संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात सलग विजय मिळवला. ३१ जानेवारीला झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ८ विकेटने भारताचा पराभव झाला.
 
न्यूझीलंड विरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपली असून, ही मालिका भारतीय महिला संघाने २-१ ने जिंकली आहे. तर ६ फेब्रुवारीपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

तर भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड विरोधातील ५ सामन्यांच्या मालिकेतील ४ सामने खेळून झाले आहेत. यातून पहिले तीन सामने हे भारतीय संघाने जिंकले आहेत. तर ३१ जानेवारीला झालेल्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडचा ८ विकेटने विजय झाला होता. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे.  तर पाचवा सामना हा ३ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. यानंतर तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला  ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.