मुंबई : आयपीएलचा 15 वा सिझन 26 मार्चपासून सुरु होणार आहे. दरम्यान आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत रोहितने मुंबई इंडियन्स सोडून केलेल्या हार्दिक पंड्याला आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिक पंड्या आता गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे.
रोहित शर्मा म्हणाला, हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्ससाठी जे योगदान दिलं आहे, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्याने आमच्या टीमसाठी नेहमी चांगला खेळ केला आहे. आता तो एका दुसऱ्या टीमचा कर्धणार आहे, यावेळी माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत.
आयपीएल 2022पूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमने रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. त्यामध्ये हार्दिक पंड्याच्या नावाचा समावेश नव्हता. यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाही याचा मोठा धक्का बसला. मुंबई इंडियन्सने केवळ रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव आणि किरण पोलॉर्डला रिटेन करण्यात आलं.
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सच्या टीमचा कर्णधार बनला आहे. गुजरातने 15 कोटींना हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. यापूर्वी हार्दिकने कोणत्याही आयपीएलच्या टीमचं कर्णधारपद भूषवलं नाहीये.
गेल्या काही काळात हार्दिक पंड्याचा खराब फॉर्म आणि फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हार्दिकने त्यानंतर त्याच्या फिटनेसवर सातत्त्याने काम केलं. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याने यो-यो टेस्टही पास करून घेतली.