बंगळूरू : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला पुट शॉट खेळणं खूप आवडतं. त्याच्या या स्पेशल शॉटमुळे अनेकदा त्याचा फायदाही झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रोहितचा हा पुल शॉट त्याच्यासाठी अनलकी ठरताना दिसतोय. खासकरून टेस्ट सामन्यांमध्ये त्याचा हा शॉट हवा तसा खेळला जात नसल्याचं पहायला मिळालंय.
श्रीलंकेविरूद्धच्या मोहाली टेस्टमध्येही पहिल्या डावात काहीसं असंच घडताना दिसलं. यावरून माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माचे कान टोचले आहेत. गावस्कर यांच्या म्हणण्याप्रमाणे, रोहितला त्याच्या खेळीदरम्यान असे शॉर्ट्स यापुढे नाही खेळले पाहिजेत. जेव्हा तो त्याच्या आवडीचा शॉर्ट खेळतो तेव्हा त्याने याबाबत दोन वेळा विचार केला पाहिजे.
स्टार स्पोर्टशी बोलताना गावस्कर म्हणाले की, रोहितने याबाबत खरंच एकदा विचार केला पाहिजे. हा शॉर्ट तो पूर्ण ताकदीने खेळेल यात काहीच वाद नाही मात्र त्याच्याकडे यापेक्षाही बरंच काही चांगलं आहे. थोडाफार वेग असणारा प्रत्येक गोलंदाज विचार करेल की, माझ्या ओव्हरला एक-दोन सिक्स किंवा चौकार बसले तरी फरक पडत नाही, पण रोहित बॉल हवेत तरी मारेल आणि विकेट मिळेल.
गावस्कर पुढे म्हणाले की, सेट होईपर्यंत रोहित शर्माला शॉट खेळ्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. काहीवेळा भारतीय कर्णधार डावाची सुरुवात केल्यानंतर पूल शॉट खेळताना आऊट झाला, ज्यामुळे तो मोठा स्कोरही करू शकला नाही.
“रोहितला असे कमी शॉट्स खेळण्यावर काम करावं लागेल. मात्र त्याला जर असं वाटत असेल की हे शॉट्स टाळणं कठीण आहे तर त्याने हे शॉर्ट खेळावे मात्र त्यांना कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं," असा सल्लाही रोहितला दिला आहे.