Rohit Sharma Son Name : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिने 15 नोव्हेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे रोहितच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आले होते. आता रोहित आणि रितिकाच्या गोंडस बाळाचं नाव देखील समोर आलं असून पत्नी रितिकाने स्वतः एक खास फोटो शेअर करून त्याचं नाव जगासमोर आणलं आहे.
सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तेथे टीम इंडिया 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. रोहित शर्मा नवजात बाळ आणि कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी पर्थ येथे झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्याचा भाग नव्हता. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात पहिला सामना जिंकून भारताने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच रोहित शर्मा देखील ऑस्ट्रेलियाला दाखल झाला असून उर्वरित सर्व सामने भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळेल.
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने रविवारी सकाळी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला. ज्यात ती डिसेंबर महिन्याचे स्वागत करताना दिसली. यावेळी तिने घराबाहेर उभारलेल्या चार पुतळ्यांना Rit (रितिका), Ro (रोहित), Sammy (समायरा ) आणि लहान पुतळ्याला Ahaan (अहान) असे नाव दिले. मुलाच्या जन्म झाल्यावर रितिका आणि रोहितने पोस्ट लिहून आपल्या तिघांच्या कुटुंबात आता चौथ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे अशी पोस्ट टाकली होती. रितिकाने रविवारी शेअर केलेल्या फोटोमधून मुलाचे नाव 'अहान' असल्याचे स्पष्ट झालं आहे.
अहान हे खूप गोंडस नाव असून सध्याच्या काळात हे नावही ट्रेंडमध्ये आहे. अहान या नावाचा अर्थ म्हणजे सूर्योदय, प्रकाशाचा पहिला किरण आणि नवी सुरुवात असा होतो. या नावाची मुले त्यांच्या नावाच्या अर्थाप्रमाणेच चमकदार आणि अनेक प्रतिभांनी परिपूर्ण असतात असं ज्योतिष तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2015 रोजी क्रिकेटर रोहित शर्मा याने त्याची मॅनेजर आणि मैत्रीण असलेल्या रितिका सजदेहशी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याला 2018 मध्ये गोंडस मुलगी झाली जिचे नाव समायरा असे ठेवण्यात आले.