नशीब कधी ना कधी...; सलग दुसरा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माचा बदलला सूर

गुजरातच्या हातातोंडाशी आलेला विजय मुंबईने हुसकावून घेतला. 

Updated: May 7, 2022, 09:49 AM IST
नशीब कधी ना कधी...; सलग दुसरा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माचा बदलला सूर title=

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात काही फारशी चांगली झालेली दिसली नाही. मात्र आता ही टीम विजयाच्या पथावर आली आहे. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 5 रन्सने पराभव केला. गुजरातच्या हातातोंडाशी आलेला विजय मुंबईने हुसकावून घेतला. 

दरम्यान यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद दिसून आला. दरम्यान सामन्यानंतर रोहित शर्माने हा सामना कठीण होणार असल्याचं वाटलं होतं, असं मत व्यक्त केलंय. 

रोहित शर्मा म्हणाला, आम्ही बरेच दिवस विजयाची वाट पाहत होतो आणि नशीब कधी ना कधी बदलणारच होतं. आम्ही 15-20 रन्स कमी केले. गुजरातने मिडल ऑर्डरमध्ये चांगली गोलंदाजी केली त्यानंतर टीम डेव्हिडने डाव संपवला. दव  असल्याने आणि खेळपट्टीमुळे सामना सोपा होणार नाही याची आम्हाला कल्पना होती.

तुम्हाला सामन्याची स्थिती पाहता गोलंदाजी बदलण्याचा निर्णय घ्यावा लागतो. बॉल चांगल्या पद्धतीने बॅटवर येत होता त्यामुळे आम्ही स्लो गोलंदाजवर भर दिला. आम्ही सध्या केवळ एका सामन्यावर भर देतोय आणि पुढच्या सामन्यांचा जास्त विचार करत नाही, असंही रोहितने सांगितलं आहे. 

मुळात आजंही आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. आम्ही अजून चांगला खेळ करू शकत होतो. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 रन्स वाचवणं सोपं नसतं. मात्र डॅनियल सॅम्सने चांगली गोलंदाजी केली, असं म्हणत रोहितने त्याचं कौतुक केलं.