"तो खूप कठीण काळ होता...मी फक्त माझ्या रूममध्ये एकटा बसून विचार करत होतो की नेमकी चूक काय झाली...त्यावेळी मी जवळपास 1 महिना डिप्रेशनमध्ये होतो आणि मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती."
हे शब्द दुसऱ्या कोणाचे नाहीत तर नेहमी हसत खेळत मैदानावर उतरणाऱ्या हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माचे आहेत. तुम्हालाही हे वाचून धक्का बसला असेल की, रोहित शर्माने देखील डिप्रेशनचा सामना केला आहे.
टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज 30 एप्रिल असून रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक अडचणींचा सामना केला आहे. यामध्ये एक मुख्य म्हणजे जवळपास एक महिना रोहित शर्माने डिप्रेशनचा सामना केला आहे.
ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा 2011 साली वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये रोहितला स्थान देण्यात आलं नव्हतं. अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करून दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणाऱ्या नामांकित भारताच्या टीममध्ये रोहितला स्थान मिळवता आलं नव्हतं.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना रोहित शर्माने याबाबत खुलासा केला आहे. यावेळी रोहित शर्मा म्हणाला, तो खूप कठीण काळ होता. खरं सांगायचं तर ते सोपं नव्हतं. कारण वर्ल्डकप एक अशी गोष्ट आहे, जी खेळण्याची आणि त्याचा भाग होण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. तसंच टीमच्या यशात मी माझं योगदान देऊ इच्छितो होतो.
माझ्या अजूनही लक्षात आहे की, त्यावेळी साऊथ आफ्रिकेमध्ये मी होतो आणि मला ही गोष्ट कळली होती. त्यावेळी मी तिथे सिरीज खेळ होतो. माझ्याकडे त्यावेळी बोलण्यासाठी कोणीही नव्हतं. त्यावेळी मी एकटा माझ्या रूममध्ये जाऊन विचार करत बसलो की, माझ्याकडून नेमकं काय चुकलं आणि मी कुठे चांगली कामगिरी करू शकत होतो, असंही रोहितने म्हटलंय.
1 महिना डिप्रेशनमध्ये होता रोहित
या कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला, मला वाटतं तो खूप महत्त्वाचा काळ होता. त्यावेळी मी केवळ 23 किंवा 24 वर्षांचा होतो. मात्र मला त्यावेळी माहिती होतं की, माझ्या आत अजूनही खूप क्रिकेट बाकी आहे. हा माझा शेवट नाही आणि मी कमबॅक करू शकतो. आणि त्यानंतर मी ठरवलेलं तसंच झालं. मात्र यावेळी 1 महिना मी डिप्रेशनमध्ये होतो आणि कोणाशीही बोलत नव्हतो.