IPL: मुंबई इडियन्स विरुद्ध पहिली हॅटट्रिक, पण आता रोहित शर्मा ६ वर्ष गोलंदाजीपासून दूर

रोहितने मुंबई इडियन्स विरुद्ध घेतली होती पहिली हॅटट्रिक

Updated: Sep 16, 2020, 05:46 PM IST
IPL: मुंबई इडियन्स विरुद्ध पहिली हॅटट्रिक, पण आता रोहित शर्मा ६ वर्ष गोलंदाजीपासून दूर title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सीजनची सुरुवात लवकरच होणार आहे. युएईच्या भूमीवर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना कर्णधार रोहित शर्माकडून पुन्हा एकदा मोठी अपेक्षा आहे. पण रोहित शर्माने काही वर्षांपूर्वीच गोलंदाजीने देखील कमाल केली होती.

आयपीएलच्या इतिहासात २००९ च्या आयपीएलची पहिली हॅटट्रिक घेण्याचा विक्रम देखील रोहित शर्माच्या नावावर आहे. महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्माने तेव्हा मुंबई इंडियन्स संघाविरूद्धच हा रेकॉर्ड केला होता. मुंबई इंडियन्सने त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातच मोठं यश मिळवलं आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईला त्याने सर्वाधिक वेळा कप जिंकणारा संघ बनवला आहे.

आयपीएल-2009 मध्ये कामगिरी
आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात सर्व सामने दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात आले होते. यामुळे सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजीना अधिक लक्ष्य केलं जात होतं. त्यामुळे स्पिनर्सकडे गोलंदाजी द्यावी लागत होती. दरम्यान, मे २००९ ला डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहित शर्माने मुंबई इंडियन्स विरुद्ध ६ रन देत सीजनमधली पहिली हॅट्रिक घेतली होती. 

आयपीएल -2009 च्या 32 व्या सामन्यात डेक्कन चार्जर्सने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 145 धावा केल्या. डेक्कन चार्जर्सच्या या स्कोअरमध्ये रोहितने 38 धावांची खेळी साकारताना महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. पण सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत मुंबई इडियन्स जिंकेल असा सगळ्यांना वाटत होतं. पण काहीतरी वेगळंच घडलं.

आधी आरपी आणि त्यानंतर रोहितचा कहर

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली आणि वेगवान गोलंदाज आरपी सिंगने सचिन व जयसूर्या यांना स्वस्तात माघारी पाठवले. पण दुसर्‍या टोकाला दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्यूमिनी चांगला खेळ खेळत होता. त्यानंतर डेक्कनचा कर्णधार अ‍ॅडम गिलक्रिस्टने अचानक रोहितच्या हातात बॉल दिला. त्यावेळी मुंबई इंडियन्सला 26 चेंडूंत 43 धावांची गरज होती आणि ड्युमिनी फिफ्टीच्या जवळ होता. अशा परिस्थितीत मुंबई विजयी होऊ शकते असं सगळ्यांना वाटत होतं.

15 व्या ओव्हरमध्ये रोहितला बॉलिंग करण्याची करण्याची संधी मिळाली. रोहितने 5 व्या बॉलला अभिषेक नायर (Abhishek Nair) आणि सहाव्या बॉलला हरभजन सिंह (Harbhajan Singh)यांना आऊट केलं. पण ड्युमिनी अजूनही मैदानावर होता.

रोहितने 15व्या ओव्हरमध्ये रन करण्याची संधी नाही दिली. ड्युमिनीने 16 व्या ओव्हरमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर रोहितने 17 वी ओव्हर टाकायला घेतली. पहिल्याच बॉलवर त्याने ड्युमिनीला आऊट केले. यासह रोहितची 'ब्रोकन हॅटट्रिक' पूर्ण झाली. त्याच्या गोलंदाजीमुळे डेक्कन चार्जर्सनेही सामना जिंकला.

6 वर्षे गोलंदाजी नाही
आयपीएलमध्ये रोहित शर्माने आपल्या खात्यात 15 बळी नोंदवले आहेत आणि टीम इंडियाकडूनही स्पॉट ऑफ पार्ट टाईमसह त्याने जोरदार कामगिरी केली आहे, परंतु गेल्या 6 वर्षांपासून तो गोलंदाजी करत नाही. खरं तर, आयपीएल -2014 दरम्यान त्याच्या खांद्याला काही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने गोलंदाजीचा मोह सोडून आपल्या फलंदाजीकडे पूर्ण लक्ष दिले आहे.