Mohammed Shami Choose The Best Captain Of India: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका मुलाखतीमध्ये त्याचा आवडता कर्णधार कोण याबद्दल मोकळेपणे भाष्य केलं आहे. कोणता कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली तुला खेळायला सर्वाधिक आवडतं असा प्रश्न शमीला विचारण्यात आला आहे. तसेच सर्वोत्तम कर्णधार कोण आहे या प्रश्नाचं उत्तरही शमीने दिलं आहे.
शमी नुकताच एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमामध्ये शमीला महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तिघांचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. तुझ्या मते धोनी, कोहली आणि रोहित या तिघांपैकी सर्वोत्तम कर्णधार कोण आहे? असा प्रश्न न्यूज 18 च्या कार्यक्रमात शमीला विचारण्यात आला. या प्रश्नाला शमीने फार कठीण प्रश्न विचारला आहे असं म्हणत उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र अखेर त्याने धोनी, कोहली आणि रोहित या तिघांपैकी एक नाव निवडलं.
"हे पाहा या प्रश्नाचं उत्तर देणं खरं तर फार कठीण आहे. कारण माझ्या मते या तिघांची तुलना करणं फार चुकीचं आहे. मात्र कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक यश मिळवलं याबद्दल आपल्याला बोलताना येईल. धोनीने भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिला. सर्वांची नेतृत्व करण्याची पद्धत वेगळी असते. मात्र मिळालेलं यश या परिमाणावर विचार केला तर नक्कीच धोनी हा सर्वोत्तम कर्णधार आहे," असं उत्तर शमीने दिलं.
शमी धोनी, कोहली आणि रोहितच्या नेतृत्वाखाली संघाचा भाग राहिलेला आहे. त्यामुळे या तिघांबद्दल शमी मनमोकळेपणे बोलला. 'धोनी फार बोलत नाही. मात्र त्याच्याकडे रणनीति फार उत्तम असते याची जाणीव खेळताना होते,' असं शमीने सांगितलं. 'विराट कोहली मैदानामध्ये फार आक्रमक असतो. रोहितकडे तर या तिन्ही गोष्टी आहेत,' असं शमीने तिघांबद्दलचं आपलं मत व्यक्त करताना सांगितलं.
2023 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अगदी उत्तम कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये शमी हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. अंतिम सामन्यामध्ये भारताला जेतेपदाला गवसणी घालता आली नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभूत करत वर्ल्डकप जिंकला. भारताला वर्ल्डकप जिंकला आला नसला तरी शमीच्या गोलंदाजीने अनेक आजी-माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले. शमीच्या या कामगिरीबरोबरच क्रिकेटमधील योगदानासाठी यंदाच्या वर्षी भारत सरकारकडून अर्जुन पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं.