यांच्या मदतीनं टेलरनं केली हिंदी ट्विट!

भारत आणि न्यूझीलंडमधली शेवटची टी-20 भारतानं जिंकत मालिकाही खिशात टाकली.

Updated: Nov 9, 2017, 05:59 PM IST
यांच्या मदतीनं टेलरनं केली हिंदी ट्विट!

मुंबई : भारत आणि न्यूझीलंडमधली शेवटची टी-20 भारतानं जिंकत मालिकाही खिशात टाकली. शेवटच्या टी-20मध्ये भारतानं न्यूझीलंडचा ६ रन्सनं पराभव करत मालिका २-१नं जिंकली. याचबरोबर न्यूझीलंडचा बॅट्समन रॉस टेलर आणि भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्यामधली ट्विटरवरची मस्तीही संपुष्टात आली आहे. हिंदीमधून ट्विट करायला ज्यांनी मदत केली, त्यांची नाव टेलरनं सांगितली आहेत.

पहिल्या वनडेनंतर टेलर आणि सेहवागमध्ये ट्विटर युद्ध सुरू झालं. पहिल्या वनडेमध्ये रॉस टेलरनं शानदार कामगिरी केली होती. खूप चांगला खेळलास रॉस टेलर, दर्जी जी, असं ट्विट सेहवागनं केलं होतं.

सेहवागच्या ट्विटवर मग टेलरनं हिंदीतून प्रतिक्रिया दिली. “शुक्रिया वीरेंद्र सहवाग भाई, अगली बार अपना ऑर्डर समय पर भेज देना ताकि मैं आपको अगली दिवाली के पहले भेज दूं.. हैप्पी दिवाली”, असं ट्विट टेलरनं केलं.

या हिंदीतल्या ट्विटबाबत आता रॉस टेलरनं स्पष्टीकरण दिलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून टेलरनं हे गुपित उलगडवलं आहे. देव आणि न्यूझीलंडचा खेळाडू ईश सोदी यांच्या मदतीनं आपण हिंदीत ट्विट केल्याचं टेलरनं इस्टाग्रामवरून सांगितलं आहे. शिलाई आणि धुलाई पुढच्या काळात सुरुच राहिल, असंही टेलर म्हणालाय.

टेलरच्या या हिंदीतल्या ट्विटवर सेहवागलाही आवडली होती. टेलरनं आधार कार्ड काढावं, असं आवाहन सेहवागनं केलं होतं. सेहवागच्या या आवाहनाला आधार कार्डच्या ट्विटर हँडलवरूनही उत्तर देण्यात आलं होतं. 

 

टेलर आणि सेहवागची ही जुगलबंदी ट्विटरवर अनेक चाहत्यांनी रिट्विट केली होती.