नवी दिल्ली : स्वाती महाडिक आणि निधी मिश्रा या दोन महिलांनी देशासाठी आपले पती गमावले. तरी देखील त्यांनी हिंमत न हारता स्वतःला देखील देशसेवेसाठी समर्पित केले आहे. त्यामुळेच या दोन्ही महिलांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सलाम केला आहे.
या महिलांच्या सन्मानार्थ सचिनने एक ट्वीट केले. त्यात त्याने असे म्हटले आहे की, "दोन महिलांनी आपले बहादूर पती गमावले आणि स्वतःला राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. स्वाती महाडिक आणि निधी मिश्रा यांना सलाम. जय हिंद!
Two women lost their brave husbands and chose to serve the nation. Nothing but respect for Swati Mahadik and Nidhi Misra. Jai Hind! @adgpi pic.twitter.com/qcDS0Cz0ov
— sachin tendulkar (@sachin_rt) September 10, 2017
शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती यांनी शनिवारी लेफ्टनंट पदाचा कार्यभार घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, मला देखील माझ्या पतीप्रमाणे दहशतवादयांशी लढायचे आहे. स्वाती यांनी ११ महिन्यांपूर्वी सर्व्हिस सिलेक्शन कमिशनच्या फायनल लिस्टमध्ये आपली जागा निर्माण केली आणि त्यानंतर चेन्नईत ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमीतून ट्रेनिंग घेण्यासाठी चेन्नईला रवाना झाल्या. नुकतेच त्यांचे हे कठीण ट्रेनिंग पूर्ण झाले आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामधील हाजी नाका परिसरात २०१५ मध्ये दहशतवादांशी लढताना ४१ राष्ट्रीय राइफल्स चे कमांडींग ऑफिसर कर्नल महाडिक (३९) हे गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नॉर्थ इस्ट मधील ऑपरेशन रहिनोच्या वेळेस बहादुरीसाठी त्यांना २००३ मध्ये सेना मेडलने गौरवित करण्यात आले होते.