जवळच्या मित्रामुळेच ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या

सुशील कुमारची 7 दिवस पोलीस कोठडी मिळावी म्हणून पोलिसांचे न्यायालयात प्रयत्न

Updated: May 29, 2021, 04:56 PM IST
जवळच्या मित्रामुळेच ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या

मुंबई: ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशील कुमारला पोलिसांनी बेड्या ठोकून ताब्यात घेतलं आणि न्यायालयात हजर केलं आहे. न्यायालयाकडून पोलिसांनी 7 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी देखील केली आहे. सुशील कुमारचा एक धक्कादायक व्हिडीओ आता पोलिसांच्या हाती लागला आहे.

या व्हिडीओमध्ये सुशील कुमारच्या हातात काठी असून तो आणि त्याचे साथीदार कुस्तीपटू सागर धनखडला बेदम मारहाण करत आहेत. तर सागर आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे भिक मागत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुशील कुमारने मौन धारण केलं. अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सुशील कुमारला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. 

सुशील कुमारने केलेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ त्याच्याच गटातील एक मित्राने आपल्या मोबाईलवर शूट केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सुशील कुमारच्या अडचणी दोन मित्रांमुळे आणखी वाढल्या आहेत. पहिला मित्र ज्याने व्हिडीओ शूट केला आणि दुसरा मित्र जो सरकारी साक्षीदार म्हणून उभा राहणार आहे. 

सुशील कुमारचा ऑलिम्पिकमधील प्रिन्स नावाचा मित्र आता सरकारच्या बाजूने साक्ष देणार आहे. त्याच्या साक्षीमुळे सुशील कुमारचे कारनामे आणखी समोर येण्याची शक्यता आहे. 4 मे रोजी दोन गटांमध्ये झालेल्या वादातून सुशील कुमारसह त्याच्या साथीदारांनी मिळून कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या केली. या प्रकऱणी सुशील कुमारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्य़ायालयात हजर केलं. पोलिसांनी यावेळी 7 दिवस सुशीलची कोठडी मिळण्याची मागणी कोर्टात केली आहे.