6,6,6,1nb,6, 0,1nb,7nb,6,6...; मैदानात फलंदाजाचं वादळ, ओव्हरमध्ये ठोकल्या 39 धावा; मोडला युवराजचा 17 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

सामोआच्या डॅरियस व्हिसरने (Samoa's Darius Visser) वानुआतुविरुद्धच्या सामन्यात 39 धावा देऊन एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा पुरुषांचा T20I विश्वविक्रम मोडीत काढला.  

शिवराज यादव | Updated: Aug 20, 2024, 02:45 PM IST
6,6,6,1nb,6, 0,1nb,7nb,6,6...; मैदानात फलंदाजाचं वादळ, ओव्हरमध्ये ठोकल्या 39 धावा; मोडला युवराजचा 17 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड title=

क्रिकेटमध्ये रोज नवनवे रेकॉर्ड होत असतात. त्यातच आता एका फलंदाजाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगचा 17 वर्षं जुना सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. सामोआच्या डॅरियस व्हिसरने मंगळवारी एपियामध्ये वानुआतुविरुद्ध टी-20 वर्ल्डकप पूर्व आशिया-पॅसिफिक क्षेत्र पात्रता फेरीत इतिहास रचला. 28 वर्षीय फलंदाजाने 15 व्या षटकात 39 धावा ठोकत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा टी-20 मधील विश्वविक्रम मोडीत काढला.

व्हिसरने रेकॉर्ड करताना नलिन निपिकोच्या चेंडूवर सहा षटकार ठोकले. यासह पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला. यासह एखाद्या संघाने एका षटकात 36 पेक्षा जास्त धावा केल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

व्हिसरने डीप मिडविकेटवर तीन षटकार ठोकत दमदार सुरुवात केली होती. पुढील चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. पण चेंडू नो बॉल असल्याने फ्री हिट देण्यात आला. या चेंडूवर त्याने चौथा षटकार ठोकला. पाचवा चेंडूही डॉट होता, पण संघालासाठी हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याने सलग नो बॉल टाकले. यानंतर व्हिसरने फ्री हिटवर आणखी दोन षटकार ठोकले आणि अशा प्रकारे एका ओव्हरमध्ये 39 धावा मिळाल्या. यामध्ये सहा षटकार आणि तीन नो बॉल होते. 

यासह व्हिसर युवराज सिंग, किरेन पोलार्ड आणि दिपेंद्र सिंग ऐरी यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. या सर्वांनी एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते. 

व्हिसरने या सामन्यात 62 चेंडूत 132 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने एकूण 14 षटकार ठोकले. यासह तो शतक ठोकणारा सामोआचा पहिला फलंदाज ठरला आहे. संघाच्या एकूण धावसंख्येत त्याचा वाटा 75.86 टक्के होता.