मुंबई : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचं गरोदरपणात भरपूर वजन वाढलं होतं. पण आता बाळंतपणानंतर सानियाने आपलं 26 किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी करून सानिया फिट झाली असून पुन्हा एकदा ती टेनिस कोर्टवर येण्यासाठी आतुर आहे.
सानिया मिर्झाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. जो व्हिडिओ बघून तुम्ही तिच्या मेहनतीला सलाम कराल. सानिया मिर्झाने सांगितलं की, या दरम्यान तिचं 23 किलो वजन वाढलं होतं. आता वर्कआऊट करून तिने 26 किलो वजन कमी केलं आहे.
सानियाने व्हिडिओ शेअर करताना ही पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते की, पोस्ट प्रेग्नेसीनंतर पुन्हा हेल्दी आणि फिट होण्याकरता मी जे काही केलं त्यातील काही भाग इथे शेअर करते. मला खूप लोकांनी विचारलं की, मी कसं? कुठे? कशाप्रकारे आणि केव्हा हे वजन कमी केलं. तर त्या सगळ्यांसाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. प्रचंड मेहनत, नियमितपणा आणि चिकाटीसोबत मी हे सगळं केलं आहे.
बाळंतपणानंतर आपण स्वतःला वेळच देऊ शकत नाही. असा नव्याने आई झालेल्यांच म्हणणं असतं, पण हे सगळं शक्य असल्याचं सानियाने सांगितलं आहे. नवीन आई झालेल्या प्रत्येकीसाठी सानियाचा हा व्हिडिओ नक्की प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.
सानियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर सानियाची चांगली मैत्रिण आणि फिल्ममेकर, कोरिओग्राफर फराह खानने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, या व्हिडिओत मी तुला पाहून थक्क झाली आहे. सानियाने गेल्यावर्षी 2018 मध्ये 30 ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला आहे.