भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटूच्या घरी आनंदाचा क्षण साजरा केला जात आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक करणारा खेळाडू सरफराज खानच्या घरी गोंडस मुलाचा जन्म झाला आहे.
सरफराज खानची पत्नी जहूरने सोमवारी रात्री एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सरफराज खानने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न केलं होतं. सरफराज खानने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना खुशखबर दिली. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर 2 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत त्याने मुलाला आपल्या मांडीवर घेतले आहे. तसेच दुसऱ्या फोटोत त्याचे वडील बाळासोबत दिसत आहेत.
त्यामुळे नौशाद खान आजोबा तर मुशीर खान काका झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सरफराजची पत्नी त्याला साथ देताना दिसली होती. या सामन्यात सरफराजने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्याही केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सरफराज खानने शानदार फलंदाजी केली. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सरफराज खान सपशेल अपयशी ठरला होता. त्याने 3 चेंडूंचा सामना केला आणि त्याला एकही धाव करता आली नाही.
मात्र, दुसऱ्या डावात त्याने शानदार खेळी केली. सरफराजने 195 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 3 षटकारही मारले. मात्र, भारतीय संघाने हा सामना गमावला.
सरफराज खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ती 16 कोटींहून अधिक आहे. सरफराज खान मैदानात आणि मैदानाबाहेर खूप चर्चेत असतो. त्याच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आयपीएल आहे, जिथे तो 2015 पासून आतापर्यंत वेगवेगळ्या संघांचा भाग आहे.
गेल्या 8-9 वर्षात सरफरजने एकट्या IPL मधून अंदाजे 5 कोटी 65 लाख रुपये कमावले आहेत. आरसीबीने त्याला 2015 मध्ये विकत घेतले. यानंतर 2018 मध्ये त्याला कायम ठेवण्यासाठी बोली लावण्यात आली. 2019 नंतर, सरफराज पंजाब किंग्जमध्ये सामील झाला आणि 2022 मध्ये, त्याला दिल्ली कॅपिटल्सने 20 लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेतले.
आयपीएलच्या कमाईशिवाय सरफराज देशांतर्गत क्रिकेटमधूनही भरपूर कमाई करतो. त्याला प्रत्येक रणजी सामन्यासाठी सुमारे 40 हजार रुपये मिळतात आणि विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अलीकडून त्याला अनुक्रमे सुमारे 25 हजार आणि 17500 रुपये मिळतात. याशिवाय तो जाहिरातींमधूनही पैसे कमावतो.
त्याचबरोबर सरफराज खानला वाहनांची खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये रेनॉल्ट डस्टर एसयूव्ही आणि ऑडीचा समावेश आहे. आनंद महिंद्राने त्यांना एक SUV भेट दिली होती.