इंदूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने शानदार विजय झाला. पण न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने कर्णधार विराट कोहली आणि टीम प्रशासनावर निशाणा साधला आहे. टीममध्ये आयपीएलच्या बंगळुरुचे ३ फास्ट बॉलर कसे? असा सवाल स्कॉट स्टायरिसने विचारला आहे. इंदूरमध्ये झालेल्या टी-२० मॅचमध्ये नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे हे खेळाडू खेळले. विराट आयपीएलच्या बंगळुरु टीमचा कर्णधार आहे, यावरुनच स्कॉट स्टायरिसने टीका केली आहे.
आयपीएलच्या मागच्या दोन मोसमात बंगळुरु टीमची बॉलिंग सगळ्यात खराब आहे. तरी टीम इंडियामध्ये बंगळुरुचे ३ बॉलर असणं आश्चर्यकारक आहे. बंगळुरुचाच युझवेंद्र चहलही टीममध्ये आहे, पण त्याला अंतिम-११ मध्ये खेळवलं नाही, असं ट्विट स्कॉट स्टायरिसने केलं आहे.
I'm a little surprised India have gone into this match with THREE @RCBTweets bowling options plus Y Chahal in reserve when theyve been consistently the worst @IPL bowling side over the last couple of seasons
— Scott Styris (@scottbstyris) January 7, 2020
स्टायरिसने टीका केली असली तरी इंदूरच्या या टी-२० मॅचमध्ये नवदीप सैनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. सैनीने ४ ओव्हरमध्ये १८ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनेही चांगली बॉलिंग केली. सुंदरने आविश्का फर्नांडोची विकेट घेऊन भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
२० ओव्हरमध्ये श्रीलंकेला १४२/९ एवढा स्कोअर करता आला. शार्दुल ठाकूरने २३ रन देऊन सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक ३४ रन केले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये भारताच्या बॅट्समननी श्रीलंकेच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला. राहुलने ३२ बॉलमध्ये ४५ रन तर शिखर धवनने २९ बॉलमध्ये ३२ रन केले. श्रेयस अय्यरने २६ बॉलमध्ये ३४ रनची खेळी केली, तर विराट १७ बॉलमध्ये ३० रनवर नाबाद राहिला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी टी-२० मॅच शुक्रवारी पुण्यात खेळवली जाणार आहे. ३ मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे. गुवाहाटीमध्ये झालेली पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली होती.