शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, सचिनला म्हणाला...

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची जीभ पुन्हा घसरली आहे.

Updated: Jul 8, 2020, 05:29 PM IST
शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, सचिनला म्हणाला...

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची जीभ पुन्हा घसरली आहे. यावेळी शाहिद आफ्रिदीने सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे. सचिन तेंडुलकर शोएब अख्तरची बॉलिंग खेळायला घाबरायचा, असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केलं आहे. शाहिद आफ्रिदीने पहिल्यांदाच हे वक्तव्य केलेलं नाही. ९ वर्षांपूर्वीही आफ्रिदी हेच म्हणाला होता. 

'सचिन तेंडुलकर स्वत:च्या तोंडाने तर म्हणणार नाही, की मी घाबरतो. शोएब अख्तरचे काही स्पेल होते, ज्याला फक्त सचिनच नाही तर जगातले इतर क्रिकेटपटूही घाबरायचे. जेव्हा तुम्ही मिड ऑफ किंवा कव्हर्समध्ये फिल्डिंग करत असताना तुम्हाला हे दिसायचं. खेळाडूची बॉडी लॅन्ग्वेज बघून या गोष्टी समजतात. बॅट्समन दबावात आहे, हे तुम्ही सहज समजू शकता,' असं आफ्रिदी म्हणाला.

सचिनला डरपोक म्हणल्यावर शाहिद आफ्रिदीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'शोएबने कायमच सचिनला घाबरवलं, असं मी म्हणणार नाही. पण शोएबने त्याच्या काही स्पेलमधून सचिनसह जगातल्या दिग्गज बॅट्समनना माघार घ्यायला भाग पाडलं,' असं शाहिद आफ्रिदी म्हणाला. 

सचिन शोएब अख्तरला घाबरायचा, या २०११ सालच्या वक्तव्यावर तू अजूनही ठाम आहेस का? असा प्रश्न महिला अँकरने शोएबला ऑनलाईन मुलाखतीदरम्यान विचारला. 

शोएबच्या पुस्तकात दावा

शोएब अख्तरने त्याच्या पुस्तकामध्येही सचिन आपल्या बॉलिंगला घाबरायचा, असा दावा केला होता. यानंतर शोएब अख्तरवर टीका झाली होती. पुस्तक विकण्यासाठी शोएबने हा दावा केल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. त्यावेळीही शाहिद आफ्रिदीने शोएबच्या या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. 

'सचिन शोएबला घाबरायचा. मी हे स्वत: बघितलं आहे. स्क्वेअर लेगवर फिल्डिंग करत असताना शोएबच्या बॉलिंगवर सचिनचे पाय कापायचे,' असं शाहिद आफ्रिदी म्हणाला होता. हा दावा करताना शाहिद आफ्रिदीने कोणत्याही मॅचचं उदाहरण दिलं नव्हतं. दुसरीकडे वर्ल्ड कपमध्ये सचिन पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमललाही घाबरला होता, असं वक्तव्य आफ्रिदीने केलं आहे.