मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होत नसल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर दु:खी आहे. दोन्ही देशांमध्ये २००७ पासून एकही सीरिज झालेली नाही. २०१२मध्ये भारतामध्ये एका छोट्या सीरिजचं आयोजन करण्यात आलं होतं पण यानंतर दोन्ही देशांमधले संबंध बिघडल्यामुळे पुन्हा सीरिज होऊ शकली नाही.
भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळता येत नाही हे दु:खदायक आहे. अॅशेसप्रमाणेच भारत-पाकिस्तान सीरिजही क्रिकेट जगतातली सगळ्यात मोठी सीरिज आहे, असं मत शोएब अख्तरनं व्यक्त केलं. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होत नसल्यामुळे खेळाडूंना हिरो बनण्याची संधी मिळत नसल्याची खंत अख्तरनं बोलून दाखवली.
भारताकडून मला खूप प्रेम मिळालं. असंच प्रेम पाकिस्तानच्या सध्याच्या खेळाडूंनाही मिळालं पाहिजे, असं शोएब अख्तरला वाटत आहे. दोन्ही देशांमध्ये जेव्हा बातचित सुरु होईल तेव्हाच क्रिकेटलाही सुरुवात होईल, असं शोएब म्हणालाय. पीसीबी आणि बीसीसीआयची यामध्ये काहीच चूक नाही. दोन्ही क्रिकेट बोर्डांना भारत-पाकिस्तान सीरिज घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया अख्तरनं दिली आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसीच्या टुर्नामेंटमध्येच खेळत आहेत. याआधी २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या दोन्ही टीम समोरासमोर आल्या होत्या. ग्रुप स्टेजमध्ये भारतानं पाकिस्तानला हरवलं होतं तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला होता.