'एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल पण...' गावसकरांचा शोएब अख्तरवर निशाणा

भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. 

Updated: Apr 15, 2020, 10:42 PM IST
'एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल पण...' गावसकरांचा शोएब अख्तरवर निशाणा title=

मुंबई : भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात ३ वनडे मॅचची सीरिज खेळवून निधी गोळा करा, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ठेवला होता. शोएब अख्तरच्या या प्रस्तावावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी निशाणा साधला आहे. 

'एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडणं शक्य आहे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत-पाकिस्तान सीरिज शक्य नाही,' असं सुनिल गावसकर म्हणाले आहेत. गावसकर यांनी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांच्याशी त्यांच्या युट्यूब चॅनलवर बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही टीम वर्ल्ड कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील, पण दोन्ही देशांमध्ये सीरिज सध्यातरी शक्य नाही, असं गावसकर यांनी सांगितलं. 

गावसकर यांच्या या उत्तरावर शोएब अख्तरने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. शोएबने ट्विटरवर लाहोरमध्ये बर्फ पडल्याचा फोटो टाकला आहे. 'सनीभाई मागच्या वर्षी लाहोरमध्ये बर्फ पडला होता, त्यामुळे काहीही अशक्य नाही,' असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे.

शोएब अख्तरच्या या प्रस्तावावर कपिल देव यांनीही टीका केली होती. आम्हाला पैशांची गरज नाही, भारताकडे बराच पैसा आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये खेळाडूंचे जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असं कपिल देव म्हणाले होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या खराब संबंधांचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. २०१२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची सीरिज झाली होती. या दोन्ही टीम आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. कोरोना व्हायरसमुळे जगातल्या इतर स्पर्धांप्रमाणेच क्रिकेट स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या आहेत.