मुंबई : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केलं. २०१० साली या दोघांचं लग्न झालेलं असलं तरी सोशल नेटवर्किंगवर मात्र या दोघांना नेहमीच लक्ष्य केलं जातं. शोएबशी लग्न केल्यानंतर सानिया मिर्झाच्या देशभक्तीवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. सानिया मिर्झावर सातत्यानं टीका होत असतानाच तिचा पती शोएब मलिकनं भारताच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत एक ट्विट केलं आहे. शोएब मलिकनं भारताला ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरातल्या सगळ्या भारतीयांना स्पेशली माझ्या घरात राहणारीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, असं ट्विट शोएब मलिकनं केलं आहे.
Wishing Indians all over the globe (specially the one at home) a very #HappyIndepenceDayIndia
— Shoaib Malik (@realshoaibmalik) August 15, 2018
१४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनालाही सानिया मिर्झानं पाकिस्तानच्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. माझ्या सगळ्या पाकिस्तानी फॅन्सना आणि मित्रांना त्यांच्या भारतीय वहिनीकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, असं ट्विट सानियानं केलं होतं.
सानिया मिर्झाच्या या ट्विटवर एका यूजरनं निशाणा साधला. सानिया मिर्झा तुला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा... तुझा स्वातंत्र्य दिन आजच असेल ना? असा सवाल एका यूजरनं सानिया मिर्झाला विचारला. सानिया मिर्झानंही या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलं. नाही... माझ्या आणि माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिन उद्याच आहे. माझ्या नवऱ्याच्या देशाचा स्वातंत्र्य दिन आज आहे... तुमचा गोंधळ दूर झाला असेल. पण तुमचा स्वातंत्र्य दिन कधी आहे? असा सवाल सानियानं विचारला.
Jee nahi.. mera aur mere country ka Independence Day kal hai, aur mere husband aur unnki country ka aaj!! Hope your confusion is cleared !!Waise aapka kab hai?? Since you seem very confused .. https://t.co/JAmyorH0dV
— Sania Mirza (@MirzaSania) August 14, 2018
मूल भारतीय का पाकिस्तानी?
'एचटी ब्रंच'ला दिलेल्या एका मुलाखतीत सानिया मिर्झानं नुकतंच आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी शेअर केल्यात. २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत विवाह केल्यानंतर सानिया संकुचित विचारांच्या ट्रोलर्सच्या टीकेची धनीही ठरली होती... विवाहानंतर आठ वर्ष उलटल्यानंतरही या दोघांचा विवाह चर्चेत आहे.
लग्नानंतर सोशल मीडियावर सतत ट्रोल केल्या जाण्यावर सानिया म्हणते, मी आणि शोएबनं भारत आणि पाकिस्तानच्या एकात्मतेसाठी विवाह केला नव्हता. लग्नानंतर आम्ही दोघंही आपापल्या देशांसाठी खेळतोय. मला ट्रोलचा काहीही फरक पडत नाही. मी भारताची मुलगी आहे आणि नेहमीच राहील.
या मुलाखतीत सानिया-शोएबचं मूल भारतीय असेल पाकिस्तानी? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर तिनं उत्तर दिलं... 'सेलिब्रिटी असल्याकारणानं या पद्धतीचे टॅग्स पब्लिक लाईफचा एक भाग आहे. मी माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खेळते... आणि हेच शोएबही करतो. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या चांगल्याच कळतात. आम्ही या पद्धतीचे टॅग्स गंभीरतेनं घेत नाही. मीडियासाठी या चांगल्या हेडलाईन्स होऊ शकतील... पण आमच्याकडे त्यांना थारा नाही... घरी आम्ही अशा विषयांवर चर्चा करत नाही'
शोएब मलिक गेल्या वर्ष इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झाला होता. पाकिस्ताननं ही ट्रॉफी जिंकली होती... तर सानिया मिर्झानं भारताकडून सहा डबल्स टायटल्स आपल्या नावावर केलेत.
सानियाचं बाळ ऑक्टोबर महिन्यात या जगात पहिलं पाऊल टाकू शकतं. साहजिकच सध्या सानियानं खेळातून तूर्तास ब्रेक घेतलाय.