कोलकाता : भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यामध्ये झालेल्या वादाला १० वर्षांपेक्षा जास्तचा काळ लोटला आहे. पण या वादाबाबत सौरव गांगुलीनं मौन सोडलं आहे. क्रिकेट इतिहासकार बोरिया मुजुमदार यांनी लिहिलेल्या 'इलेव्हन गॉड्स अॅण्ड अ बिलियन इंडियन्स' या पुस्तकामध्ये दादानं दिलखुलास बातचित केली आहे.
या पुस्तकामध्ये गांगुलीनं सप्टेंबर २००५मध्ये बुलावायोमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या टेस्टआधी झालेल्या घटनांबाबत माहिती दिली आहे. त्यादिवशी संध्याकाळी ग्रेग चॅपलनं मला एक टीम दाखवली. या टीमची ग्रेगनं टेस्ट मॅच खेळण्यासाठी निवड केली होती. या टीममध्ये काही महत्त्वाच्या खेळाडूंना स्थान देण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे मी हैराण झालो, असं गांगुली म्हणाला.
चॅपलनं दाखवलेल्या या टीमला मी विरोध केला होता. ज्या खेळाडूंना काढायचं आहे त्यांनी भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. तुला प्रशिक्षक बनून फक्त ३ महिने झाले आहेत. परिस्थिती समजून घेऊनच कडक निर्णय घे, असा सल्ला मी चॅपलला दिला पण त्याला ग्रेग चॅपल टीम बनवायची होती, असं वक्तव्य गांगुलीनं या पुस्तकात केलं आहे. डिसेंबर २००३मध्ये ज्या ग्रेग चॅपलनं मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मदत केली तो ग्रेग चॅपल २००५ सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यात नव्हता, असं गांगुली म्हणालाय.
जुलै २००५मध्ये चॅपल भारताचा प्रशिक्षक झाला. मार्च २००५मध्ये धीम्या ओव्हररेटमुळे गांगुलीवर ६ मॅचची बंदी आणण्यात आली. यावेळी गांगुलीऐवजी द्रविडकडे कॅप्टनशीप देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २००५च्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी गांगुलीकडे पुन्हा कॅप्टनशीप देण्यात आली. या दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच गोष्टी योग्य नव्हत्या, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली आहे.