बीसीसीआयने धोनीसोबत करार का केला नाही? गांगुली म्हणतो...

बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत करार न केल्यामुळे अनेकांना धक्का बसला.

Updated: Jan 19, 2020, 12:50 PM IST
बीसीसीआयने धोनीसोबत करार का केला नाही? गांगुली म्हणतो...

मुंबई : बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत करार न केल्यामुळे अनेकांना धक्का बसला. २०१९-२० या वर्षासाठी बीसीसीआयने खेळाडूंना करारबद्ध केलं, पण या करारामध्ये भारताला २ वर्ल्ड कप आणि १ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या एमएस धोनीचं नाव दिसलं नाही. बीसीसीआयने करार न केल्यामुळे धोनीचं भवितव्य काय? धोनी पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

धोनीसोबत करार का झाला नाही? असा प्रश्न बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीलाही विचारण्यात आला. पण मी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं सौरव गांगुलीने सांगितलं. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

बीसीसीआयच्या कराराबाबत धोनीला माहिती देण्यात आली होती, असं बीसीसीआयच्या अधिकार्याने एएनआयशी बोलताना सांगितलं. एखाद्या खेळाडूसोबत करार करण्यासाठी त्याने कमीतकमी ३ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळणं बंधनकारक आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

२०१९ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलनंतर धोनी क्रिकेट खेळला नाही. बीसीसीआयने केलेला हा करार ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतचा आहे, त्यामुळे धोनीशी करार करण्यात आला नसल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तसंच धोनीशी करार झाला नाही, म्हणजे तो भारताकडून खेळू शकणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

एमएस धोनी हा २०२० सालचा टी-२० वर्ल्ड कप खेळू शकतो, असे संकेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. धोनी टी-२० वर्ल्ड कप खेळणार का नाही ते आयपीएलमधल्या धोनीच्या आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे, असं रवी शास्त्री म्हणाले होते.