close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बीसीसीआयमध्ये 'दादागिरी'; गांगुलीने स्वीकारलं अध्यक्षपद

बीसीसीआयमध्ये आजपासून दादागिरी सुरु झाली आहे.

Updated: Oct 23, 2019, 11:54 AM IST
बीसीसीआयमध्ये 'दादागिरी'; गांगुलीने स्वीकारलं अध्यक्षपद
फोटो सौजन्य : एएनआय

मुंबई : बीसीसीआयमध्ये आजपासून दादागिरी सुरु झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. सौरव हा बीसीसीआयचा ३९वा अध्यक्ष असणार आहे. गांगुलीच्या नेतृत्वात नव्या समितीचं गठन झाल्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती बरखास्त झाली आहे. विनोद राय हे प्रशासकीय समितीचे प्रमुख होते. सौरव गांगुली आणि त्याच्या टीमने पदभार स्वीकारल्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली आहे. 

बीसीसीआयच्या समितीमध्ये सगळ्या पदांसाठी एक-एकच अर्ज आल्यामुळे या समितीची निवड बिनविरोध झाली आहे. गांगुलीच्या अध्यक्षतेखालच्या या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह सचिवपदी, उत्तराखंडचे महिम वर्मा हे उपाध्यक्षपदी, अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल हे खजिनदारपदी,  केरळचे जयेश जॉर्ज हे संयुक्त सचिवपदी आणि तर ब्रिजेश पटेल आयपीएलच्या अध्यक्षपदी असणार आहेत. 

गांगुली अध्यक्षपदी विराजमान झाला असला तरी त्याला पुढच्या वर्षापर्यंतच अध्यक्षपदावर राहता येणार आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार एखाद्या पदाधिकाऱ्याला लागोपाठ ६ वर्षच या पदावर राहता येतं. गांगुली हा २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पुन्हा बीसीसीआयचा अध्यक्ष होण्यासाठी गांगुलीला काही काळ बीसीसीआय आणि संलग्न संस्थांच्या पदावर राहता येणार नाही. 

४०० पेक्षा जास्त मॅच खेळलेला गांगुली हा बीसीसीआयचा पहिलाच अध्यक्ष आहे. याआधी १९५४ ते १९५६ या कालावधीमध्ये ३ टेस्ट मॅच खेळलेले विजयनगरमचे महाराजा विजय आनंद गणपती राजू हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. 

२३३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारे सुनील गावस्कर आणि ३४ सामन्यांचा अनुभव असणारे शिवलाल यादव यांनीही क्रिकेट बोर्डाचं नेतृत्व केलं होतं. पण, ते दोघंही काही काळासाठीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते.