मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दलचा एक किस्सा सांगताना श्रीसंतला अश्रू अनावर झाले. बिग बॉस या शोमध्ये श्रीसंतनं सचिनबद्दलची ही आठवण सांगितली. २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११च्या ५० ओव्हर वर्ल्ड कप टीमचा श्रीसंत हिस्सा होता. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला होता. २००७ च्या फायनलमध्ये श्रीसंतनं पाकिस्तानच्या मिसबाह उल हकचा कॅच पकडून भारताला मॅच जिंकवून दिली.
वर्ल्ड कप २०११ च्या दोन वर्षानंतर सचिननं एका मुलाखतीमध्ये माझं नाव घेतलं. वर्ल्ड कप विजयामध्ये श्रीसंतनं महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं सचिन म्हणाला. त्यावेळी मी आनंदानं वेडा झालो, असं सांगताना श्रीसंतला अश्रू अनावर झाले.
सिक्रेट रूममध्ये पाठवलेल्या श्रीसंत आणि अनूप जलोटा बिग बॉसच्या घरामध्ये परत आले आहेत.
आयपीएल २०१३ दरम्यान श्रीसंतला स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये पकडण्यात आलं. यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळण्याची बंदी घालण्यात आली. दिल्ली पोलिसांनी श्रीसंतला अटकही केली होती. जुलै २०१५ साली श्रीसंत याप्रकरणातून सुटला. पण बीसीसीआयनं त्याच्यावरची जन्मभराची बंदी उठवली नाही.
ऑक्टोबर २०१७ साली केरळ उच्च न्यायालयानं श्रीसंतवर पुन्हा जन्मभराची बंदी घातली. सध्या श्रीसंतची कायदेशीर लढाई सुरू आहे. बंदी उठेल आणि पुन्हा क्रिकेट खेळायला मिळेल, अशी इच्छा श्रीसंतनं शोमध्ये व्यक्त केली. अनूप जलोटा यांनी श्रीसंतचं सांत्वन केल्यानंतर श्रीसंत रडायला लागला.