Women Hockey Player : हॉकी विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रा येथील बुंदुकटरा येथे राहणारी राज्यस्तरीय महिला हॉकी खेळाडूचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी एका हॉटेल रूममध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या युवकाच्या विरुद्ध यापूर्वीच महिला खेळाडूने छेडछाड आणि चुकीची वागणूक केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी मंगळवारी रात्री या घटने संदर्भात संपूर्ण माहिती दिली. रविवारी महिला खेळाडूच्या मृत्यूची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी म्हंटले की, 'महिला खेळाडू रविवारी संध्याकाळी घरातून निघाली आणि ताजगंज येथील एका हॉटेल रूमवर थांबली. सोमवारी तिचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी चौकशी केल्यावर समोर आले की, रविवारी रात्री आठ वाजता एक युवक तिला भेटण्यासाठी आला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांनी रात्री महिला खेळाडूला जेवणासाठी सुद्धा विचारले होते परंतु तिने नकार दिला.
पोलिसांनी माहिती दिल्यानुसार, सोमवारी सकाळी 11 वाजता जेव्हा रूमचा दरवाजा हॉटेल कर्मचाऱ्यांनी डुप्लीकेट चावी लावून उघडला तेव्हा त्यांना तरुणीचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून तिला रात्री भेटायला आलेल्या युवकाला ओळखले. त्यांनी सांगितले की 2020 मध्ये महिला हॉकी खेळाडूने त्या युवकावर छेड़छाड़ आणि 2024 मध्ये तिच्यावर जबरदस्ती केल्याची तक्रार नोंदवली होती.
हेही वाचा : धोनीला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास, 7 दिवस टेंटमध्ये राहिला, पण थालाने ढुंकूनही पाहिलं नाही
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे गगनला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. तो जामिनावर होता. पोलीस अधिकारी जसवीर सिंह यांनी सांगितले की, मुलीच्या मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये कविता नावाच्या नोंदणीकृत क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करण्यात आले होते. यामध्ये युवती कोणत्यातरी कारणामुळे नाराज असल्याचे समोर येते. एसीपी सुकन्या शर्मा यांनी सांगितले की, 'प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दिसून येते, मुलगी कशावरून तरी नाराज होती'. पोलिसांनी सांगितले की, महिला हॉकी खेळाडूच्या कुटुंबीयांनी गगनने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.