'जबाबदारी दाखव अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा'; शास्त्रींचा पंतला इशारा

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे.

Updated: Sep 16, 2019, 09:46 AM IST
'जबाबदारी दाखव अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा'; शास्त्रींचा पंतला इशारा title=

मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच शास्त्री यांनी ऋषभ पंतला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जबाबदारी दाखव, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. खराब शॉट खेळून आऊट झाल्यामुळे याआधीही पंतवर मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती. कौशल्य असो वा नसो, ऋषभ पंत असे शॉट खेळून फक्त स्वत:लाच नाही, तर टीमलाही निराश करत आहे, असं शास्त्री म्हणाले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये फॅबियन एलनच्या बॉलिंगवर पहिल्याच बॉलला पंत मोठा शॉट मारायच्या नादात आऊट झाला. या शॉटवर शास्त्रींनी नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्यासोबत कर्णधार खेळत आहे आणि तुम्ही आव्हानाचा पाठलाग करत आहात, अशावेळी समंजसपणा दाखवून खेळणं गरजेचं असतं, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.

वेस्ट इंडिज दौऱ्यात पंत दोनवेळा पहिल्या बॉलवर आऊट झाला. पहिल्या टी-२०मध्ये सुनिल नारायणच्या बॉलिंगवरही पंतला शून्य रनवर माघारी परतावं लागलं होतं. पंतची बॅटिंग स्टाईल कोणीही बदलणार नाही, पण मॅचची परिस्थिती पाहून योग्य रणनिती आखत खेळणं गरजेचं असतं, असं शास्त्रींनी सांगितलं.

ऋषभ पंत या चुकांमधून शिकेल, त्याने बऱ्यापैकी आयपीएल मॅच खेळल्या आहेत, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.