मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे. याचबरोबर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचाही स्मिथनं राजीनामा दिला आहे. जगभरातल्या सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये स्मिथची गणना नेहमीच होते. पण अनेकवेळा अतीउत्साही गोष्टी केल्यामुळे स्मिथवर टीकेची झोडही उठते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या प्रकारानंतर स्मिथची प्रतिमा मलिन झाली आहे. कर्णधारपद गमवावं लागल्यानंतर आयसीसीनंही स्मिथवर कारवाई केली. एका टेस्ट मॅचसाठी स्मिथचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच त्याची १०० टक्के मॅच फी कापण्यात आली आहे.
लेग स्पिनर आणि खालच्या क्रमांकावर बॅटिंग करत स्मिथनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पण थोड्याच दिवसात स्मिथ जगभरातला दिग्गज बॅट्समन झाला. इंग्लंडविरुद्ध अॅशेसच्या पर्थ टेस्टमध्ये स्मिथनं सर्वाधिक २३९ रन्स केले होते. २०१७ साली स्मिथनं टेस्ट क्रिकेटमध्ये १ हजार रन्स पूर्ण केले.
टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या स्मिथला कर्णधारपदाचा कधीही दबाव आला नाही. २०१५ साली मायकल क्लार्ककडून स्मिथनं ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद घेतलं. त्यावेळी स्मिथ फक्त २६ वर्षांचा होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये रडीचा डाव खेळायची ही काही स्मिथची पहिली वेळ नाही. भारताविरुद्धच्या बंगळुरू टेस्टमध्येही स्मिथ वादात अडकला होता. डीआरएस घेण्यासाठी स्मिथनं पॅव्हेलियनमधल्या खेळाडूंकडे इशारा केला होता. तर २०१६ साली क्राईस्टचर्चमध्ये न्यूझिलंडविरुद्धच्या टेस्टमध्ये स्मिथनं अंपायरच्या निर्णयाचा विरोध केला होता. यानंतर त्याला दंडही भरावा लागला होता.