मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंवर नाराज झाले आहेत. वर्ल्ड कप ६ महिन्यांवर आला असताना धोनी आणि धवन स्थानिक क्रिकेटपासून लांब का आहेत, असा सवाल गावसकर यांनी विचारला आहे. वर्ल्ड कपआधी खेळाडूंना सराव होणं गरजेचं आहे. त्यामुळे शिखर धवन आणि महेंद्रसिंग धोनीला स्थानिक क्रिकेट स्पर्धांपासून बाहेर ठेवण्याची परवानगी कशी देण्यात आली, असं गावसकर म्हणाले. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये पुढच्या वर्षी ३० मेपासून सुरु होईल. १४ जुलैला वर्ल्ड कप फायनल खेळवण्यात येणार आहे.
ओपनर शिखर धवन टेस्ट टीममध्ये नाही. पण तो ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये कुटुंबासोबत आहे. तर धोनी १ नोव्हेंबरला वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज संपल्यानंतर क्रिकेट खेळला नाही. धोनीला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये स्थान मिळालं नाही. धोनीनं २०१४ साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता तो फक्त भारताच्या वनडे टीमचा भाग आहे.
तुम्ही स्थानिक क्रिकेट का खेळत नाही हे धवन आणि धोनीला विचारलं पाहिजे. खेळाडू जर देशासाठी खेळत नसतील तर त्यांना स्थानिक क्रिकेट न खेळण्याची परवानगी कशी देण्यात आली हे बीसीसीआयला विचारण्यात यावं. असं गावसकर एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हणाले. जर भारताला वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तर खेळाडू फिट असणं आणि त्यांनी मॅच खेळत राहणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.
धोनीनं वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सीरिज खेळली नाही. तो टेस्ट क्रिकेट खेळत नाही. धोनीनं शेवटची मॅच १ नोव्हेंबरला खेळली आणि आता तो पुढची मॅच जानेवारी महिन्यात खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधल्या त्याच्या जागेवर आणखी प्रश्न उपस्थित होतील, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं. वयासोबत खेळाडूचा खेळही बदलतो. जर तुम्ही स्थानिक क्रिकेट खेळलात तर कारकिर्द वाढायला मदत होते आणि सरावही होतो, असं गावसकर यांना वाटतं.