मेलबर्न : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यावेळी टीम इंडियाचा खरा हिरो ठरतोय तो सूर्यकुमार यादव. नेदरलँड्सविरुद्ध सूर्यकुमारची बॅट तळपली. या सामन्यात सूर्याने 25 बॉलमध्ये नाबाद 51 रन्स केले. यावेळी त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून देखील गौरवण्यात आलं. मुख्य म्हणजे यामुळे तो आता टी-20 मधील नंबर वन फलंदाज बनला आहे.
तुम्हाला वाटत असेल आम्ही आयसीसीच्या क्रमवारीबद्दल बोलतोय. पण नाही, या क्रमवारीत सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मोहम्मद रिझवान पहिल्या तर न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे दुसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे या वर्षात सर्वात जास्त T20 आंतरराष्ट्रीय रन्स त्याने केलेत. यानुसार सुर्या आता नंबर वन फलंदाज बनला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सूर्यकुमारने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानलाही मागे टाकलंय. नुकतंच सूर्या भारतासाठी सर्वात फास्ट 1000 T20 आंतरराष्ट्रीय रन्स करणार ठरला आहे.
सूर्यकुमार यादव नंबर 1 फलंदाज
सूर्यकुमार यादवने 2022 या वर्षामध्ये आतापर्यंत 25 सामन्यांमध्ये 41.28 च्या सरासरीने 867 रन्स केले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवान या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. मोहम्मद रिझवानने यावर्षी 19 सामन्यांत 51.56 च्या सरासरीने 825 रन्स केलेत.
सूर्यकुमार यादवने भारतासाठी आतापर्यंत एकूण 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. यामध्ये सूर्यकुमारने 34 डावांमध्ये 1111 रन्स केले आहेत. त्याची कारकीर्दीची सरासरी 39.68 आणि स्ट्राइक रेट 177.48 आहे. त्याच्या खात्यात आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.