न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा नवा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभवाला सामोरं जावं लागलं.

Updated: Jan 6, 2020, 01:42 PM IST
न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा नवा विक्रम title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभवाला सामोरं जावं लागलं. याचबरोबर ३ टेस्ट मॅचची ही सीरिज न्यूझीलंडने ३-० अशी गमावली. न्यूझीलंडवर पराभवाची नामुष्की ओढावली असली तरी रॉस टेलरने मात्र खास विक्रम केला आहे. रॉस टेलर हा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा न्यूझीलंडचा खेळाडू बनला आहे.

सिडनी टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी नॅथन लायनच्या बॉलिंगवर टेलरने ३ रन काढून स्टीफन फ्लेमिंगचा विक्रम मो़डीत काढला. ३५ वर्षांच्या टेलरने ९९ टेस्ट मॅचमध्ये ४६.२८ च्या सरासरीने ७,१७४ रन केले आहेत. यामध्ये १९ शतकं आणि ३३ अर्धशतकं आहेत.

फ्लेमिंगने १९९४ ते २००८ या कालावधीमध्ये १११ टेस्ट मॅचमध्ये ७,१७२ रन केले. टेलरला या सीरिजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. याआधी झालेल्या मेलबर्न टेस्टमध्येच टेलरला हा विक्रम करता आला असता, पण त्याला फक्त ६ रनच करता आल्या होत्या. मागच्या ६ इनिंगमध्ये टेलरला ८०, २२, ४, २, २२ आणि २२ रनच करता आल्या.

टेलरने मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडचा सर्वाधिक वनडे रन करण्याचा विक्रमही केला होता. टेलरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक रन आहेत. टेलरने सिडनी टेस्टमध्ये १७,२५० रनचा आकडा पार केला, यामध्ये ३९ शतकं आणि ८८ अर्धशतकं आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडिया २ टेस्ट मॅच खेळणार आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये टेलर १०० टेस्ट खेळणारा न्यूझीलंडचा खेळाडू ठरेल. याआधी फ्लेमिंग, व्हिटोरी आणि मॅकल्लम यांनी न्यूझीलंडकडून १०० टेस्ट खेळण्याचा विक्रम केला आहे.

सिडनी टेस्टमध्ये न्यूझीलंडची टीम ४१६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करत होती. पण १३६ रनवरच किवींचा ऑल आऊट झाला आणि त्यांना २७९ रननी पराभव पत्करावा लागला. याआधी न्यूझीलंडला पर्थ आणि मेलबर्नमध्येही पराभवाचा धक्का लागला होता.