टी-१० क्रिकेट लीग : फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सच्या या खेळाडूंवर नजर

टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमाच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा मुकाबला पखतून्सबरोबर होणार आहे.

Updated: Dec 2, 2018, 06:43 PM IST
टी-१० क्रिकेट लीग : फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सच्या या खेळाडूंवर नजर title=

शारजाह : टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमाच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा मुकाबला पखतून्सबरोबर होणार आहे. या दोन्ही टीम सुपर लीगमध्ये टॉपवर होत्या. नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये याआधी क्वालिफायर-१ आणि क्वालिफायर-२च्या मॅच झाल्या आहेत. या दोन्ही मॅचमध्ये पखतून्सनी वॉरियर्सचा पराभव केला आहे. डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नॉर्थन वॉरियर्सना पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीच्या पखतून्सकडून कडवं आव्हान मिळणार आहे.

दोन्ही टीममध्ये झालेल्या क्वालिफायर फायनल मॅचमध्ये पखतून्सचा १३ रननी विजय झाला होता. पखतून्सनी या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करून १० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १३५ रन केले होते. याबदल्यात नॉर्थन वॉरियर्सनंही जलद रन केले पण त्यांना १२२ रनपर्यंतच मजल मारता आली.

नॉर्थन वॉरियर्सकडे अनेक तगडे खेळाडू असल्यामुळे या मॅचमध्ये बदला घेण्यासाठीच ते मैदानात उतरतील. नॉर्थन वॉरियर्सच्या निकोलस पूरन, लिंडल सिमन्स, हार्डस विल्जोएन, रोवमॅन पॉवेल, आंद्रे रसेल यांच्या कामगिरीवर सगळ्यांचच लक्ष असेल.

निकोलस पूरन

वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. पूरननं एलिमिनेटरमध्ये जबरदस्त बॅटिंग करत मराठा अरेबियन्सचा पराभव केला होता. पूरननं या मॅचमध्ये १६ बॉलमध्ये ४३ रनची खेळी केली होती. पंजाब लिजंड्सविरुद्धच्या मॅचमध्येही पूरनने फटकेबाजी केली होती. त्यामुळे टी-१० क्रिकेट लीगमधला सर्वाधिक स्कोअर झाला होता. पूरननं त्या मॅचमध्ये १० सिक्स आणि २ फोर लगावले होते. फक्त २५ बॉलमध्ये पूरननं ७७ रनची वादळी खेळी केली होती.

लिंडल सिमन्स

निकोलस पूरनला या लीगमध्ये त्याचा वेस्ट इंडिजचाच सहकारी लिंडल सिमन्सचीही चांगली साथ मिळाली. एलिमिनेटरमध्ये मराठा अरेबियन्सविरुद्ध सिमन्सनं १४ बॉलमध्ये ३१ रन केले होते. सिमन्सनं पंजाब लिजंड्सविरुद्धच्या मॅचमध्ये २१ बॉलमध्ये ३६ रन केले होते. बंगाल टायगर्सविरुद्ध सिमन्सनं २८ बॉलमध्ये ४४ रनची खेळी केली होती. पण दुसऱ्या बाजूनं कोणीच साथ न दिल्यामुळे नॉर्थन वॉरियर्सचा ३८ रननी पराभव झाला होता.

रोवमॅन पॉवेल

रोवमॅन पॉवेलनंही एलिमिनेटरमध्ये पखतून्सविरुद्ध ८० रनची खेळी केली होती. पण इतर मॅचमध्ये पॉवेलला चमक दाखवता आली नाही. फायनलमध्ये पॉवेल ही कसर भरून काढेल अशी नॉर्थन वॉरियर्सची अपेक्षा आहे.

हार्डस विल्जोएन

हार्डस विल्जोएननं या लीगमध्ये चांगली बॉलिंग केली आहे. लीगमधल्या काही मॅचमध्ये विल्जोएननं प्रत्येक ओव्हरला सरासरी ५ रनपेक्षा कमी रन दिल्या. मराठा अरेबियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये विल्जोएननं २ ओव्हरमध्ये ६ रन देऊन ३ विकेट घेतल्या आहेत. पखतून्सविरुद्धच्या मॅचमध्ये विल्जोएन महागडा ठरला होता.

या मॅचमध्ये नॉर्थन वॉरियर्सना सर्वाधिक धोका कर्णधार शाहिद आफ्रिदीचा आहे. क्वालिफायर फायनलमध्ये आफ्रिदीनं १७ बॉलमध्ये ५९ रनची खेळी केली होती.

टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.