T20 World Cup 2022 India Vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं क्षेत्ररणाचा निर्णय घेतला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय मैदानातील परिस्थिती पाहून घेतल्याचं रोहित शर्मानं सांगितलं. रोहित शर्मानं आपल्या प्लेईंग 11 मध्ये पाच गोलंदाजांना स्थान दिलं आहे. तर ऋषभ पंत ऐवजी संघात दिनेश कार्तिकला स्थान दिलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव सहन करावा लागला होता. या पराभवातून टीम इंडिया सावरू शकली नाही आणि सुपर 12 फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. आता भारतीय संघाला पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "एक चांगली खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर थोडे गवत आहे. दुसरीकडे थोडे ढगाळ आहे, त्यामुळे चेंडू थोडासा स्विंग होऊ शकतो. त्यामुळे याचा फायदा घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. आता आमची तयारी पूर्ण झाली आहे." दुसरीकडे, मैदानातील वातावरण पाहून हार्दिक पांड्यानं आनंद व्यक्त केला आहे. "मैदानातील प्रेक्षकांचा जोश पाहून उत्साह आणखी वाढला आहे. ऑस्ट्रेलियात चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे. मी पूर्णपणे फिट असून दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार आहे.", असं हार्दिक पांड्यानं सांगितलं.
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानंतर बाबर आझमच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होतं. "आम्हाला पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती. पण नाणेफेक आमच्या हातात नाही. आम्ही आता फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभारू. न्यूझीलंडसारखी खेळी करून भारताला रोखू", असं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं सांगितलं.
दोन्ही संघाची प्लेईंग 11
भारत- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान, बाबर आझम, शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.