कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली

श्वास रोखून धरणाऱ्या शेवटच्या ओव्हरबद्दल शरद पवार काय म्हणाले...   

Updated: Oct 23, 2022, 10:35 PM IST
कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली title=

Sharad Pawar on indvspak : वर्ल्ड कपच्या भारत आणि पाकिस्तानमधील थरारक सामन्यामध्ये भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये आर.आश्विनने एकेरी धाव घेत विजय साकार केला. या सामन्याचा शिल्पकार ठरला तो म्हणजे किंग विराट कोहली. या विजयाचं सर्व स्तरातून भारतीय संघाचं कौतुक केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.  (Sharad pawar on virat kohli latets marathi Sport news)

टीम इंडियाचे अभिनंदन! आजच्या सामन्यातील शेवटचे षटक कदाचित क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रोमहर्षक ठरल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच विजयाच्या शानदार दिवाळी भेटीसाठी भारत विराट कोहलीचे नक्कीच आभार मानेल, असंही पवार म्हणाले. 

भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत वर्ल्ड कपमधील विजयाचा नारळ फोडला आहे. किंग कोहलीने अक्षरक्ष: पाकिस्तानच्या तोंडचा विजयाचा घास हिसकावून घेतला. विराट कोहली या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने 53 चेंडूत 82 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार खेचलेत.  या विजयाने खरच विराटने भारतीयांसाठी दिवाळीचं गिफ्ट देत दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. T20 विश्वचषकाची शानदार सुरुवात असून दिवाळी सुरु झाल्याचं अमित शाह यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तर विराट कोहलीची धमाकेदार खेळी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी  संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

अखेर गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपमधील पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा वचपा टीम इंडियाने काढला. या सामन्यानंतर विराटने भारतीय फॅन्सची आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची मनं जिंकली आहेत.