रोहित अन् विराटला खेळायचाय 2024 चा टी-20 वर्ल्ड कप पण...; आगरकर कनेक्शन ठरणार निर्णायक

T-20 World Cup 2024 Virat Kohli Rohit Sharma: आयपीएलच्या 2 महिन्यांच्या कालावधीदरम्यानच 25 ते 30 खेळाडूंची एक यादी निश्चित करुन त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जाईल. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 3, 2024, 03:21 PM IST
रोहित अन् विराटला खेळायचाय 2024 चा टी-20 वर्ल्ड कप पण...; आगरकर कनेक्शन ठरणार निर्णायक title=
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जणार टी-20 वर्ल्ड कप

T-20 World Cup 2024 Virat Kohli Rohit Sharma: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात सुरु असलेल्या चर्चांमध्ये हा वर्ल्ड कप विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. मात्र आता या रहस्यावरुन पडदा उठला आहे. भारतीय क्रिकेट संघातील दोन्ही दिग्गज क्रिकेटपटू जून महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आता यासंदर्भातील अजित आगरकर कनेक्शन समोर आलं आहे.

निवड समितीला बराच विचार करावा लागणार

रोहित आणि विराटने टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केलेली असतानाच आता निवड समितीच्या प्रमुख पदावर असलेल्या अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या निवड समितीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची निवड करण्याआधी निवड समितीला बराच विचार करावा लागणार आहे. विराट आणि रोहित शर्मा या दोघांनीही आपल्याला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा आहे, असं निवड समितीला कळवलं आहे. 

सध्या निवड समितीचे सदस्य दक्षिण आफ्रिकेत

सध्या भारतीय निवड समितीमधील शिव सुंदर दास आणि सलील अंकोला हे दोघेही दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. केपटाऊनमध्ये न्यूलॅण्ड्समधील दुसऱ्या कसोटीदरम्यान या दोघांबरोबर स्वत: अजित आगरकरही उपस्थित असणार आहे. रोहित आणि कोहली या दोघांनी नोव्हेंबर 2022 मध्ये 10 तारखेला अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलच्या सामन्यानंतर एकही अंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही.

आगरकरच्या नेतृत्वाखालील समितीकडे लक्ष

रोहित आणि विराट हे दोघेही जवळपास वर्षभराहून अधिक काळापासून अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांपासून दूर असल्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्याआधी चर्चा होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे सदस्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबरच एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटीचा कर्णधार रोहित शर्मा तसेच विराट कोहलीबरोबर चर्चा करतील. 11 जानेवारीपासून मोहालीमध्ये सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी संघ जाहीर होणार आहे. त्यामुळे अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील समिती रोहित, विराटला टी-20 संघात संधी देणार की हे दोघे आयपीएलमध्ये कसे खेळणार यावरुन त्यांना संधी द्यायची की नाही हे ठरवणार याबद्दलचा खुलासा पुढील काही दिवसांमध्ये होईल.

30 खेळाडूंवर ठेवलं जाणार लक्ष

वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 वर्ल्ड कपच्या आधी आयपीएलमधील क्रिकेटपटूंसहीत एकूण 30 टी-20 स्पेशलिस्ट खेळाडूंवर निवड समितीचं लक्ष असणार आहे. आयपीएलच्या 2 महिन्यांच्या कालावधीदरम्यानच 25 ते 30 खेळाडूंची एक यादी निश्चित करुन त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जाईल. आयपीएलदरम्यान जखमी होणं तसेच फिटनेससंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. निवड समितीला प्रत्येक स्लॉटसाठी 2 खेळाडूंची आवश्यकता आहे. असं असेल तर लाइक फॉर लाइक म्हणजे त्याच दर्जाच्या खेळाडूच्या मोबदल्यात त्याच दर्जाचा खेळाडू अशी रिप्लेसमेंट शक्य होते.

आयपीएल महत्त्वाचं

नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या फिट नाहीत. आयपीएलच्या पहिल्या महिन्यामध्ये कामगिरीच्या आधारावर भारतीय संघ निवडला जाईल. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत काहीही निश्चित केलं जाणार नाही.' या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआयने कोणत्याही फ्रेंचायझीला कोणत्याही स्टार खेळाडूसंदर्भात जोपर्यंत दुखापतीसारख्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विनंती करता येत नाही," असंही सांगितलं.