टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती

India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्या 2024 च्या स्पर्धेत फायनलमध्ये मजल मारेपर्यंत अपराजित राहिले आहेत. फायनलमध्ये होणारा पराभव हा या दोन्ही संघांपैकी एका संघाचा स्पर्धेतील एकमेव पराभव ठरणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2024, 12:07 PM IST
टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती title=
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 सामन्यांचे निकाल काय सांगतात

India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारतीय संघाने तब्बल 10 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे. गुरुवारी भारताने इंग्लंडला धूर चारत अगदी दिमाखदार पद्धतीने फायनलमध्ये धडक मारली. तर त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानच्या संघाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. पहिल्यांदाच भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आमने-सामने येणार आहेत. मात्र टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही संघाचा रेकॉर्ड कसा आहे? दोन्ही संघ कितीवेळा एकमेकांसमोर आलेत? कोणी किती सामने जिंकले आहेत? यासंदर्भात आता भारतीय चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याच आकडेवारीवर आपण टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत.

दोन्ही संघ अपराजित

टी-20 वर्ल्ड कप फायनल खेळणारे भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ 2024 च्या या स्पर्धेत फायनलला पोहचेपर्यंत अपराजित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेमध्ये श्रीलंका, नेदरलॅण्ड, बांगलादेश, नेपाळ, अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. तर भारताने पाकिस्तान, अफगाणिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, बांगलादेशच्या संघाला पराभूत केलं आहे. भारताचा एक सामना पावसामुळे खेळवण्यात आला नाही. म्हणजेच या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सलग 8 सामने जिंकले असून भारताने सलग 7 सामने जिंकले आहेत. पहिल्या सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 9 विकेट्सने पराभूत करत दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या सेमी-फायनलमधून भारतीय संघ इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करुन फायनलमध्ये पोहोचला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड काय संगतो?

 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदा आमने-सामने येत असले तरी यापूर्वी दोन्ही संघ 2007 पासून 2024 पर्यंत तब्बल 6 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यापैकी 4 सामने भारताने जिंकले असून केवळ 2 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. या सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक स्कोअर 186 राहिला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने टी-20 मध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक 172 धावा केल्यात. सर्वात कमी स्कोअरबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेने भारताला एका टी-20 वर्ल्ड कप सामन्यात 118 धावांवर बाद केलं होतं. तर भारताने दक्षिण आफ्रिकेला 116 धावांवर गुंडाळलं आहे.

नक्की वाचा >> भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'

मैदान भारतासाठी पनवती?

वेस्ट इंडिजमधील बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना होणार असून या मैदानावरील रेकॉर्ड मात्र भारतासाठी चिंता वाढवणार आहे. भारत या मैदानावर 3 सामने खेळला असून त्यापैकी 2 सामने भारताने गमावलेत. मात्र या उलट दक्षिण आफ्रिकेने या मैदानात खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून केवळ एक सामना ते पराभूत झाले आहेत. ही आकडेवारी भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी आहे. ही आकडेवारी पाहून 19 नोव्हेंबर 2023 ला अहमदाबादच्या मैदानावर एकदिवसीय वर्ल्ड कपच्या फायनलला जे घडलं तेच पुन्हा बार्बाडोसमध्ये भारताच्या नशिबी नाही ना अशी शंकेची पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकली आहे.

नक्की वाचा >> 'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट

 

फायनल कधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा अंतिम सामना शनिवारी, 29 जून 2024 रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.