दुबई : यंदाच्या T20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानच्या संघानं सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली आहे. संघानं बलाढ्य भारतीय क्रिकेट संघालाही धूळ चारली आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्य़े पाकिस्तानच्या संघानं विजय मिळवला आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना नमवून पाकिस्तानचा संघ आता उपांत्य फेरीच्या मार्गावर आहे. संघाच्या या यसात मोलाचा वाटा आहे तो म्हणजे मधल्या फळीमध्ये येणाऱ्या फलंदाज आसिफ अली याचा. आसिफने प्रत्येक सामन्यात फलंदाजीला येत सामन्य़ाचा रंगच बदलल्य़ाचं पाहायला मिळालं आहे.
न्यूझीलंडविरोधातील सामन्यात आसिफ फलंदाजीसाठी आला, त्यावेळी एका क्षणी येत त्यानं 12 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने षटकार ठोकले. अफगाणिस्तानविरोधातील खेळीमध्ये पाकिस्तान सामना गमावेल असं वाटत असतानाच एकाच षटकामध्ये 4 षटकार ठोकत आसिफनं सामन्याला नवं वळण दिलं.
आपल्या खेळाच्या बळावर पाकिस्तानच्या संघाला आपण एक तगडा शेवट देऊ शकतो हेच आसिफने सिद्ध केलं आहे. पण, त्याच्यासाठी हे सर्व करणं तितकं सोपं नव्हतं. 2019 मध्येच आसिफनं त्याची मुलगी गमावली होती. त्याची लेक अवघ्या 2 वर्षांची होती. तिला कॅन्सरनं ग्रासलं होतं. विविध ठिकाणी उपचार करुनही आसिफ त्याच्या मुलीला वाचवू शकला नाही.
लाहोर, इस्लामाबाद, कराची अशा विविध ठिकाणी आपण मुलीला उपचारांसाठी नेलं होतं. अमेरिकेतही तिच्यावर उपचार केले, पण शेवटी तिला वाचवता आलं नाही. उपचारांदरम्यानच तिनं अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला होता. हे सारंकाही आसिफला हादरवून टाकणारं होतं.
Asif Ali. pic.twitter.com/YjWqt97ID5
— (@tamashbeen_) October 29, 2021
एक वेळ असा होता, ज्यावेळी पाकिस्तानच्या क्रिकेट संघात त्याला जागाही नव्हती. पण, पाकिस्तान सुपर लीगमधील कामगिरीनं त्याच्या कारकिर्दीला नवं वळण मिळालं. संघाच्या पडत्या काळात या खेळाडूची कामगिरी आणि परिस्थितीवर मात करत कमबॅक करण्याची त्याची क्षमता पाहता क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं मन त्यानं जिंकलं आहे.