Team India CAC Member Angry On Gautam Gambhir: भारताचा माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. परांजपे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सध्या जे सहप्रशिक्षक आहेत त्यांनाच कायम ठेवलं पाहिजे असं म्हटलं आहे. भारताला टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकवून देण्यामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सहप्रशिक्षकांना कायम ठेवण्याची भूमिका बीसीसीआयने घ्यायला हवी असं या माजी खेळाडूने म्हटलं आहे.
भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबरच विक्रम राठोड (फलंदाजीच प्रशिक्षक), पारस महांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा करारही संपुष्टात आला. त्यानंतर बीसीसीआयने 9 जुलै रोजी गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीरने स्वत: बीसीसीआयकडे काही सहाय्यक प्रशिक्षकांची नावं सुचवली. रयान टेन डोएशेट, अभिषेक नायकर, विनय कुमार, मॉर्नी मॉर्केल यांची नावं गंभीरकडून सुचवण्यात आला.
गंभीरने सुचवलेल्या नावांवर जतीन परांजपे यांनी आक्षेप घेतला आहे. 'फ्री प्रेस जर्नल'शी संवाद साधताना जतीनने, प्रशिक्षक स्वत:ची प्रशिक्षकांची टीम घेऊन येण्याचा ट्रेण्ड हा फुटबॉलमध्ये असल्याचं नमूद केलं. सध्याच्या सहाय्यक प्रशिक्षकांना बदलण्याची नेमकी गरज काय आहे? असा प्रश्नही जतीनने विचारला आहे. भारतीय संघाला मागील वर्षी वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहचवण्यात आणि आता टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिल्याचं जतीनने अधोरेखित केलं आहे.
नक्की वाचा >> BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण
"प्रशिक्षकांनी त्यांची स्वत:ची टीम प्रशिक्षणासाठी आणण्याची परंपरा फुटबॉलमधील आहे. एकदा मॅनेजर बदलला की तो त्याची टीम तयार करतो. यामध्ये टेक्निल डायरेक्टर्सही असतात. मग ही सहा ते आठ जणांची टीम प्रशिक्षण देते. आता हे क्रिकेटमध्येही घडत आहे," असं क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असलेल्या जतीन परांजपे यांनी म्हटलं.
"जे गंभीरला योग्य वाटेल तेच होईल पण मला कळत नाही की, तुम्ही 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप फायनलला पोहचा, तुम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला पोहोचता, तुम्ही टी-20 वर्ल्ड कप जिंकता, मग आताच्या सहाय्यक प्रशिक्षकांचं काय चुकलं आहे? त्यांनी अशी काय चूक केली आहे त्यांचा पदभार काढला जाणार आहे?" असा संतप्त सवाल जतीन परांजपे यांनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> 'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली
जतीन परांजपे यांनी बीसीसीआय सहाय्यक प्रशिक्षकांची टीम आहे तशीच ठेवेल असंही म्हटलं आहे. "केवळ बदलायचं आहे म्हणून लोकांना बदलायचं हे चुकीचं ठरेल. क्रिकेट सल्लागार समिती सहाय्यक प्रशिक्षकांबद्दल सल्ला देत नाही. मात्र पारस महांब्रे आणि विक्रम राठोड यांचं काय चुकलं आहे? त्यांनी आपल्या संघाला प्रत्येक स्पर्धेच्या फायनलला नेलं ही चूक आहे का?" असा प्रश्न जतीनने विचारला आहे.
"आहेत तेच सहाय्यक प्रशिक्षक ठेऊन गंभीर त्यांच्याबरोबर कसं काम करतो हे पाहिलं जाईल. सध्याचा केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक त्यांच्या संघाबरोबर केवळ वर्षभरापासून आहेत. ते काही 10 वर्षांपासून सोबत नाहीत," असंही जतीन म्हणाला.