लंडन : टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यापुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकल्याचा विक्रम बनवू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सात सामने जिंकल्याचा विक्रम आहे. वेस्ट इंडिजने २००२ आणि २००६ मध्ये हा विक्रम बनविला आहे. पण यंदा वेस्टइंडिजचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला नाही. त्यामुळे भारतालाा या संघाचा विक्रम तोडण्याची सुवर्ण संधी आहे. भारताने २००९ पासून आतापर्यंत लागोपाठ सहा सामने जिंकले आहेत.
२००९ ची चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी सुमार
टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आलेली चॅम्पियन्स ट्रॉफी खूप खराब गेली होती. आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. मग भारताने वेस्ट इंडिजला अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत केले होते. ३० सप्टेंबर २००९ ला भारताने अखेरचा सामना जिंकला होता. त्यानंतर इंग्लडमध्ये २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने जिंकले होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यानंतर सेमी फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते. मग अखेरच्या सामन्यात इंग्लडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.