मुंबई : टीम इंडिया आणि वेस्टइंडिज यांच्यात वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. मात्र विराटनंतर टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी कोणाला मिळणार, याकडेच सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या टेस्ट कॅप्टन्सीबाबत रोहितने पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. (team india skipper rohit sharma give reaction on test captaincy)
रोहित काय म्हणाला?
"बघा सध्या माझं सर्व लक्ष हे विंडिज आणि श्रीलंका विरुद्धच्या मालिकेकडे आहे. आता टेस्ट कॅप्टन्सी हा विषय सोडून द्या. कसोटी कर्णधारपदाबाबत मला काही कल्पना नाही. मी सध्या येणाऱ्या सामन्यांकडे लक्ष देऊ इच्छितो", असं रोहितने नमूद केलं.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराटने टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडली. त्यानंतर रोहित कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे. विंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात आहे. त्याआधी आज (5 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळेस रोहितने ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान टीम इंडिया विंडिज विरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांची वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. तर यानंतर श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.