इतिहास साक्षीदार! न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाला रहावं लागणार सावध...

 इतिहास पाहिला तर वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमविरुद्ध न्यूझीलंडचं पारडे जड दिसतंय.

Updated: Oct 28, 2021, 10:47 AM IST
इतिहास साक्षीदार! न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाला रहावं लागणार सावध...

मुंबई : T-20 वर्ल्डकपमध्ये 2021 मध्ये भारताचा दुसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. टीम इंडियाची कमान विराट कोहलीच्या हातात असेल. त्याचबरोबर केन विलियम्सन न्यूझीलंड टीमचं नेतृत्व करणार आहे.

या वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, इतिहास पाहिला तर वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमविरुद्ध न्यूझीलंडचं पारडे जड दिसतंय. अशा स्थितीत न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियाला प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

टी20 वर्ल्ड कप: भारत 0, न्यूझीलंड 2 

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळले असून, हे दोन्ही सामने किवी संघाने जिंकले आहेत. 2007 मध्ये झालेल्या T-20 वर्ल्डकपच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही टीम आमनेसामने आल्या होत्या. ज्यावेळी न्यूझीलंडने भारताचा 10 धावांनी पराभव केला होता. यानंतर 2016 साली T-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्यांदा आमनेसामने आले. नागपुरात झालेल्या त्या सामन्यात एमएस धोनीच्या संघाला 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

18 वर्षांपासून विजयाची प्रतिक्षा

भारत-न्यूझीलंड संघ मर्यादित ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये एकूण 11 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत, त्यापैकी न्यूझीलंडने 7 सामने आणि टीम इंडियाने केवळ 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचवेळी एक सामना रद्द करण्यात आला. 2003च्या वर्ल्डकपनंतर मर्यादित ओव्हर्सच्या विश्वचषकात भारताला न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही.

मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना 1975 च्या वर्ल्डकपमध्ये झाला होता. मँचेस्टरमधील त्या सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर 1979 च्या वर्ल्डकपमध्येही भारताला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

1987 च्या वर्ल्डकपमध्ये बंगळुरूत झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 16 धावांनी पराभव केला होता. याच वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपुरात सामना झाला, ज्यामध्ये टीम इंडियाने 9 विकेट्सने विजय मिळवला. 

यानंतर 2007 आणि 2016च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये दोन्ही टीम शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते. नॉटिंगहॅममधील साखळी सामना रद्द झाल्यानंतर उपांत्य फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडले. मँचेस्टरमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात 18 धावांनी पराभव झाला होता.