कोरोना वॅक्सीन घेण्यास टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा नकार, या स्पर्धेतून बाहेर

बीसीसीआयच्या एसओपीमध्ये राज्य संघटनांना कोविड 19 प्रोटोकॉल नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

Updated: Nov 13, 2021, 02:55 PM IST
कोरोना वॅक्सीन घेण्यास टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा नकार, या स्पर्धेतून बाहेर title=

मुंबई : तमिळनाडूने या महिन्याच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने आपल्या हंगामाची सुरुवात केली. परंतु स्टार सलामीवीर मुरली विजय त्याच्या टीमपासून आणि स्पर्धेपासून दूर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुरली विजय कोविड-19 लस घेण्यास तयार नाही आणि त्याला बायो बबलमध्येही राहायचं नाही. बीसीसीआयच्या एसओपीमध्ये राज्य संघटनांना कोविड 19 प्रोटोकॉल नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय बबलचा भाग बनण्यास इच्छित नाही. हा मुरली विजयचा वैयक्तिक निर्णय असल्याचं समजतंय.
 
बीसीसीआयच्या एसओपीमध्ये असं नमूद केलं आहे की, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूला बबलमध्ये असणं आवश्यक आहे. मात्र मुरली विजयला तसं करायचं नाहीये. त्यामुळेच तामिळनाडूच्या निवडकर्त्यांनी त्याला निवडीसाठी विचारात घेतलं नाही.

मुरली विजयला वयाच्या 37व्या वर्षी फिटनेस सिद्ध करावा लागेल

तामिळनाडूच्या निवड समितीने निवड बैठकीत 37वर्षीय मुरली विजयच्या नावाची चर्चा केली नाही. जरी मुरली विजय लस घेण्यास तयार असला तरीही त्याला टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी पुन्हा एकदा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

मुरली विजय बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. 2018 मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने हा सामना खेळला होता. विजय चेन्नई सुपर किंग्जचा देखील एक भाग होता.