IPL जिंकणाऱ्या टीमला मिळणार 'इतक्या' कोटींचं बक्षीस; उपविजेती टीमही मालामाल

जरी जेतेपद जिंकता आलं नसलं तरीही रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Updated: May 28, 2022, 02:06 PM IST
IPL जिंकणाऱ्या टीमला मिळणार 'इतक्या' कोटींचं बक्षीस; उपविजेती टीमही मालामाल title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये आता फक्त एक फायनल सामना उरला आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानने बंगळूरूचा पराभव केला. यानंतर फायनलच्या सामन्यात आता गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत रंगणार आहे. मुख्य म्हणजे यंदा रॉयल चॅलेंजर बंगळूरू जेतेपद पटकावणार अशी आशा असताना राजस्थानने चाहत्यांचं आणि बंगळूरूच्या टीमच्या खेळाडूंचं स्वप्न धुळीला मिळावलं.

मात्र जरी जेतेपद जिंकता आलं नसलं तरीही रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर बंगळूरूच्या टीमने पॉइंट्स टेबलमध्ये तिसरा क्रमांक गाठला. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या सिझनसाठी आरसीबीला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या खात्यात 6.50 कोटी रुपये जमा होतील.

29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलच्या 15 व्या सिझनचा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्या टीमला 20 कोटी तर उपविजेत्या टीमला 13 कोटी मिळणार आहे. 

दुसरीकडे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षीस रक्कम दिलं जाणार आहे. दुसरीकडे, उदयोन्मुख खेळाडू (इमेर्जिंग प्लेअरला) 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. 

दरम्यान आयपीएलचा फायनल सामना रंगण्यापूर्वी एका धडाकेबाज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. यावेळी सुपरस्टार रणवीर सिंह आणि संगीतकार ए.आर. रहमान यांचा कार्यक्रमामध्ये समावेश असणार आहे.