नॉटिंघम : टीम इंडिय़ात मागील २ वर्षापासून मोठे बदल दिसून येत आहेत. टीममध्ये सर्व स्तरावरील खेळाडूंना बदललं जात आहे. नव्या खेळाडूंना संधी दिली जात आहे. जुन्या खेळाडूंना आराम देऊन नव्या खेळाडूंसोबत प्रयोग करण्याचा प्रयत्न होत आहे. निवड समिती, कोच आणि कर्णधाराची नजर सध्या २०१९ च्या वर्ल्डकपवर लागून आहे. ते सतत टीमच्या समन्वयावर काम करीत आहेत. गोलंदाजीसह बॅटिंग कोण कितव्या नंबरवर करेल, आणि यात प्रत्येक सामन्यात बदल दिसण्याची शक्यता आहे.
या समन्वयासह टीम इंडिया याला प्राधान्य देणार आहे की, चौथ्या नंबरवर कोण बॅटिंग करेल. ही पोझिशन सर्वात महत्वाची असते, विशेष म्हणजे ही पोझिशन टॉप ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डरमध्ये संतुलन ठेवण्याचं काम करते. वनडे सामन्यात या पोझिनवर, टीम इंडियाकडून अनेक दिग्गज खेळाडू खेळलेले आहेत. पण आतापर्यंत नंबर ४ च्या पोझिशनवर, कोणताही खेळाडू आपली जागा फिक्स करू शकलेला नाही.
अशी स्थिती असताना, टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुलीने वनडेत नंबर ४ च्या पोझिशनला, एका खेळाडूचं नाव सुचवलं आहे. सौरव गांगुलीने इंग्लंडच्या विरोधात ३ सामन्यांच्या वनडे सिरिजमध्ये, टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डरला मजबुती देण्यासाठी कॅप्टन विराट कोहलीचं नाव सुचवलं होतं. विराटला सौरव गांगुलीने चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्याचा सल्ला दिला आहे.
या आधी जुलै-ऑगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर भारताने महत्वाच्या चौथ्या नंबरवर, सहा वेगवेगळ्या बॅटसमनना उतरवलं होतं. ज्यात के एल राहुल, केदार जाधव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि अजिंक्य राहणे सामिल आहे. पण सौरव गांगुलीला वाटतंय की, या क्रमावर विराट कोहली सर्वात योग्य पर्याय असेल.