व्हिडिओ : आजचा दिवस सचिनसाठी ऐतिहासिक

आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा व्यक्तिगत रूपाने द्विशतक झळकावले

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 24, 2018, 02:37 PM IST
व्हिडिओ : आजचा दिवस सचिनसाठी ऐतिहासिक title=

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक असा आहे. कारण, २०१० मध्ये आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा व्यक्तिगत रूपाने द्विशतक झळकावले. त्याची ही कामगिरी त्याच्या आणि क्रिकेटच्याही इतिहासात पहिल्यांदाच घडत होती. तो दिवस होता २४ फेब्रुवारी २०१०.

सचनिने दिला दक्षिण अफ्रिकेला चोप

त्या काळात सचिन चांगलाच फॉर्मात होता. त्याची खेळी पाहून सचिन द्विशतकी खेळी करणार याची त्याच्या चाहत्यांना खात्री होती. सचिननेही मग चाहत्यांच्या अपेक्षांचे सोनं केल. दक्षिण अफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. मालिकेतील पहिला सामना खेळला गेला होता. दुसरा सामना ग्वाल्हेरच्या मैदानावर सुरू होता. महत्त्वाचे असे की, दोन्ही संघ दबावात होते. कारण, मालिकेतील पहिला सामना भारताने अवघ्या एका धावेने जिंकला होता. या पार्श्वभूमिवर भारताच्या वतीने सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग सलामीसाठी मैदानात उतरले. सेहवागची विकेट तशी लवकर पडली. पण, सचिन मैदानावर चांगलाच रूळला. त्याने दक्षिण अफ्रिकेला चोप देण्यास सुरूवात केली.

२५ चौकार, ३ षटकारांच्या मदतीने शानदार द्विशतक

या सामन्यात सचिनने १४७ चेंडूंमध्ये २५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने द्विषतकी खेळी केली. तर, भारताने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेसमोर ४०१ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाटलाग करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेला भारताने १५३ धावांनी पराभूत केले. सचीन तेंडुलकर या सामन्यात सामनाविर ठरला.